विकास आढावा बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव येथे 19 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या विधीमंडळ अधिवेशनासाठी प्रशासनाने नियोजित वेळेत सर्व तयारी पूर्ण करण्याची सूचना ग्रामीण विकास व पंचायत राज्य विभागाचे अप्पर मुख्य सचिव व जिल्हा पभारी सचिव एल. के. अतिक यांनी केली.
शनिवारी जिल्हा पंचायत सभागृहात झालेल्या जिल्हा विकास आढावा बैठकीच्या अध्यक्षपदावरुन ते बोलत होते. अधिवेशनासाठी येणारी लोकप्रतिनिधी, अधिकारी आदींची निवास, भोजन, वाहतूक, संगणक व्यवस्था, इंटरनेट व्यवस्था पुरविणे आदी सोयी वेळेत पुरविण्यात याव्यात, अशी सूचनाही त्यांनी केली आहे.
चालु आर्थिक वर्षाच्या अंतिम टप्प्यात आपण येवून ठेपलो आहोत. त्यामुळे प्रत्येक खात्यांनी त्वरीत गतीने कामे पूर्ण करावीत. कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होवू नये यासाठी अधिकाऱ्यांनी जागरुकता बाळगावी. अमृत ग्राम पंचायतीची कामे डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावीत. मार्च अखेरपर्यंत दुसऱ्या टप्प्यातील कामे पूर्ण करण्याची सूचनाही एल. के. अतिक यांनी केली आहे.
जिह्यात 23 तज्ञ डॉक्टरांची कमतरता आहे. संबंधित खात्याच्या निदर्शनास आणून डॉक्टरांची कमतरता दूर करण्याचे आश्वासनही अतिक यांनी दिले असून केरळच्या धरतीवर बाल मृत्यूचे प्रमाण घटविण्यासाठी क्रिया योजना तयार करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.
समाज कल्याण खात्याच्या मागास व अल्पसंख्यांक विभागाच्या वसतीगृहातील विद्यार्थ्यांशी संवाद साधावा. खास करुन परीक्षेत नापास झालेल्या विद्यार्थ्यांचे कौसिलिंग करण्यात यावे. वसतीगृहात जेवणाचे मेनू चार्टतयार करावेत, त्या प्रमाणे जेवण पुरविण्यात यावेत, शाळांमध्ये शौचालयांची देखभाल करण्याचे मोठे आवाहन आहे. मुख्याध्यापकांनी प्रत्येक शाळेत पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यावर भर द्यावा, शिक्षणाबरोबरच शौचालयाचा वापर कसा करावा व इतर नागरी जबाबदाऱ्यांचीही त्यांना जाणिव करुन द्यावी, अशी सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली.
यावेळी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन एच. व्ही., पोलीस उपायुक्त रविंद्र गडादी, स्मार्टसिटीचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. प्रवीण बागेवाडी, जिल्हा नगरविकास कोषचे संचालक ईश्वर उळागड्डी, जिल्हा आरोग्याधिकारी डॉ. महेश कोनी यांच्यासह अनेक अधिकारी उपस्थित होते. स्मार्टसिटी, मनपा, बुडासह इतर खात्यातील प्रगतीचा आढावा घेण्यात आला.









