खासदार जगदीश शेट्टर यांची अधिकाऱ्यांना बैठकीत सूचना : विकासकामांचा घेतला आढावा
प्रतिनिधी/ बेळगाव
हलगा-मच्छे बायपास, बेळगाव रिंगरोड, बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर, हुनगुंद-रायचूर महामार्गाचे काम वेळेत पूर्ण करावे, अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी शनिवारी आयोजित बैठकीत केल्या. जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत विविध विभागांकडून विकासकामांचा आढावा घेण्यात आला. बेळगाव व गोव्याला जोडणारा चोर्ला रस्ता अत्यंत खराब झाला असल्याची तक्रार उद्योजकांनी केल्याने खासदार शेट्टर यांनी याची दखल घेत चोर्ला रस्त्याचे काम लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले. रिंगरोड व बेळगाव-धारवाड रेल्वेमार्गासाठी भूसंपादनाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी. भूसंपादनासाठी केआयएडीबीच्या अधिकाऱ्यांचे सहकार्य घेऊन प्रक्रिया जलदगतीने पूर्ण करण्याचे सांगण्यात आले.
हलगा-मच्छे बायपासचे काम बराच काळ रखडल्याने खासदारांनी प्रश्न उपस्थित केला. काम वेगाने पूर्ण करत शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यावर त्यांनी लक्ष वेधून घेतले. त्याचबरोबर रिंगरोडबाबत माहिती जाणून घेत कोणत्या तांत्रिक कारणाने काम थांबले आहे, याविषयी त्यांनी सविस्तर चर्चा केली. जिल्ह्यातील विकासकामे लवकर पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे धारवाड येथील अधिकारी भुवनेशकुमार, बागलकोट येथील सय्यद अमन, विशेष भूसंपादन अधिकारी राजश्री जैनापुरे, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या बेळगाव विभागाचे अधिकारी चव्हाण यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.









