कोल्हापूर :
अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासाठी राज्याशासनाने एकाचवेळी 1445 कोटींच्या निधीला मंजूरी दिली आहे. निधीचा विषय मार्गी लागला असून ही महत्वाचीबाब आहे. यासंदर्भातील अध्यादेश लवकरच निघेल. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील कामे निश्चित कालमर्यदा ठरवून पूर्ण करा, असे आदेश पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले. भुसंपादनासाठी संबंधित मिळकतधारकांसोबत बैठक घ्यावी, त्या विश्वासात घेवूनच पुढील प्रक्रिया राबवा, अशाही सूचना त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील शाहूजी सभागृहात बुधवारी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये अंबाबाई मंदिराच्या 1445 कोटींच्या विकास आराखड्याचे तसेच जोतिबा मंदिराचा 259 कोटींचा विकास आराखड्याचे सादरीकरण झाले. यावेळी ते बोलत होते. विकासकामे करण्यासाठी नेहमी पुरातत्व विभागाची अडकाटी असते, असा टोलाही पालकमंत्री आबिटकर यांनी लगावला.
जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले, अंबाबाई मंदिरात भाविकांची संख्या वाढली आहे. त्यांना पुरेसा प्रमाणात पार्कींग व्यवस्था, दर्शन मंडप, चप्पल स्टँड, पिण्याची पाणी अशा पायाभूत सुविधा देणे महत्वाचे आहे. या सर्वाचा विचार करून आराखडा तयार केला आहे. साडे आकरा एकर जागेत हा आराखडा असून यामध्ये साडे चार एकर जागेचे भुसंपादन करावे लागणार आहे. पहिल्या टप्प्यात मनपाची जागेचा समावेश असल्याने रहिवाशी, व्यापाऱ्यांच्या भुसंपादनाचा भाग कमी असणार आहे. मंदिर परिसराच्या बाहेर चार ठिकाणी पार्कीग केली जाणार असून बिंदू चौक सबजेल स्थलांतरीत करण्याचा प्रस्ताव पाठविला जाणार आहे. भुंसापदनासाठी जोतिबा मंदिर परिसरातील तसेच अंबाबाई मंदिर परिसरातील संबंधित नागरिकांसोबत पुढील आठवड्यात बैठक घेवू. शेगांव येथील विकासकामे कशी केली आहेत, याची पाहणीही केली जाईल. उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अधीक्षक अभियंता सार्वजनिक बांधकाम तुषार बुरुड, कार्यकारी अभियंता रोहित तोंदले, समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे आदी उपस्थित होते.
- टीडीआर की रोख रक्कम
भुसंपादनासाठ टिडीआर की रोख रक्कम द्यायची याबाबत योग्य पर्याय निवडला जाईल. यासाठी समितीची नियुक्ती केली जाणार असून त्यांच्यासोबत बैठक घेवून निर्णय घेतला जाणार असल्याचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले.
मंत्री मंडळाने दोन्ही विकास कामांना मंजूर दिल्याने एक महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे, निधीबाबत लवकरच शासन निर्णय ही येईल. काम करणाऱ्या यंत्रणांना एक कालबद्ध कार्यक्रम आखून देऊन कामे वेळेत आणि अखंडित सुरू होतील यासाठी प्रयत्न करावे.
प्रकाश आबिटकर, पालकमंत्री
- अंबाबाई मंदिर विकास आराखडा पहिल्या टप्प्यातील कामे
भूमिगत मजल्याचा प्रस्तावित आराखडा, लोअर लेव्हल प्लाझा एक यामध्ये स्त्रियांसाठी दहा पुरुषांसाठी दहा टॉयलेट ब्लॉक, लॉकर रूम, चप्पल स्टैंड व पिण्याचे पाण्याची सोय, दुकाने 28, अच्छादित दर्शन मंडप यात 1000 भक्तांसाठी बैठक व्यवस्था असलेला हॉल, टॉयलेट्स तसेच 4 हजार भक्तांसाठी दर्शन रांग प्रत्येकी 1000 क्षमतेचे एकूण चार हॉल अशी एकूण 5000 ची संख्या, अंफीथिएटर स्टेज व त्या समोरील प्लाझा व लँडस्केपिंग, माहिती केंद्र, सुरक्षा विभाग ऑफिस आणि ऐतिहासिक मंदिराचा जीर्णोद्धार, भूस्तरीय मजल्याच्या प्रस्तावित आराखड्यात अप्पर लेवल प्लाझा एक यामध्ये पार्किंग 50 चार चाकी व केएमटी बस थांबा, लोअर प्लाझा व पार्किंग साठी विविध ठिकाणी प्रवेश मार्ग, ड्रॉप ऑफ पॉईंट, भूमिगत मंदिरासाठी प्रवेश मार्ग इत्यादी कामांचा समावेश आहे.
- जोतिबा मंदिर विकास आराखडा पहिला टप्पा
जोतिबा मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे यासाठी 55 कोटी, यमाई मंदिर संवर्धन व दुरुस्ती करणे 25 कोटी, जुन्या ऐतिहासिक पायवाटा संवर्धन व सुशोभीकरण 21.18 कोटी, श्री जोतिबा डोंगरकड्यांचे संवर्धन करणे यामध्ये वृक्षारोपण 56 लक्ष, ज्योतस्तंभ उभारणे 15.30 कोटी, नऊ तळे परिसर 25.50 कोटी, केदार विजय गार्डन 20.40 कोटी, श्री यमाई मंदिर चाफेवरन परिसर विकास 10.20 कोटी, करपुर तलाव संवर्धन व सुशोभीकरण 7.65 कोटी, चव्हाण तलाव संवर्धन व सुशोभीकरण 20.40 कोटी, मुरलीधर पुष्करणी तलाव संवर्धन व सुशोभीकरण 10.20 कोटी, भाविकांचासाठी वाहनतळ सुविधा केंद्र उभारणी करणे 24.37 कोटी आणि घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन 27.03 कोटी अशा रीतीने एकूण 262.79 कोटींची कामे केली जाणार आहेत.
पहिल्या टप्प्यातील एकूण कामे -509 कोटी
भुसंपादन -257 कोटी
बांधकाम खर्च-200 कोटी
इतर कामे -52 कोटी
दुसऱ्या टप्प्यातील एकूण कामे-375 कोटी
भुसंपादन -281 कोटी 80 लाख
बांधकाम-93 कोटी








