प्रतिनिधी /फोंडा
चिन्मय मिशन फोंडा केंद्रातर्फे 7 ते 15 जाने. दरम्यान ‘संपूर्ण रामायण यज्ञ’ आयोजित करण्यात आला आहे. येथील क्रांती मैदानावर रोज सायं. 4.15 ते 8.15 यावेळेत चिन्मय मिशनचे दक्षिण आफ्रिका प्रमुख स्वामी अभेदानंदजी हे गोस्वामी तुलसीदास रचित रामायणावर कथानिरुपण करणार आहेत.
फोंडा केंदाचे आचार्य स्वामी सुघोषानंद यांनी पत्रकार परिषदेत संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. यावेळी आश्रमाचे अध्यक्ष संदीप निगळय़े, पदाधिकारी शांती कामत, केदार जोशी व गौरी नायक हे उपस्थित होते. शनिवार 7 रोजी खडपाबांध येथील चिन्मय आराधना आश्रमापासून क्रांती मैदानापर्यंत ‘रामचरितमानस ग्रंथ’ दिंडी काढण्यात येईल. त्यानंतर 4 वा. कार्यक्रमाचे उद्घाटन होईल. रामायण यज्ञ काळात रोज सकाळी 10 ते 12.30 वा. यावेळेत चिन्मय आराधना आश्रमात श्रीराम व अन्य देवतांची पूजा होईल. त्यासाठी इच्छुक भाविक यजमानपद भूषवू शकतात. समारोपाच्या दिवशी सोमवार 16 रोजी दुपारी पूर्णाहूती व महाप्रसाद होईल.
दरम्यान, रविवार 8 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वा. यावेळेत अभेदानंद स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली बालमेळावा व 15 रोजी सकाळी 10.30 ते 11.30 वा. यावेळेत युवा मेळावा होणार आहे. स्वामी अभेदानंदजी हे स्वामी चिन्मयानंदजी यांचे शिष्य असून प्रख्यात आध्यात्मिक जाणकार आहेत. उपनिषद, रामायण, भागवत आदी ग्रंथांवर त्यांची देशविदेशात प्रवचने झाली आहेत. सध्या ते चिन्मय मिशनचे दक्षिण आफ्रिका प्रमुख आहेत. भाविकांनी कथा निरुपणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन चिन्मय मिशन फोंडा केंद्रातर्फे यावेळी करण्यात आले.









