पाचव्या राज्य वित्त आयोगाच्या अधिकाऱ्यांची सूचना : सात जिल्ह्यांतील जि.पं.च्या विकासकामांचा आढावा
बेळगाव : बेळगाव विभागात येणाऱ्या सात जिल्ह्यांच्या जिल्हा पंचायतींअंतर्गत राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा पाचव्या वित्त आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला. जिल्हा पंचायतमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पाचव्या राज्य वित्त आयोगाचे अध्यक्ष माजी खासदार नारायण स्वामी यांच्या सूचनेवरून ही बैठक बोलाविण्यात आली होती. आयएएस अधिकारी मोहम्मद सल्लाउल्ला, राज्य लेखा परीक्षण विभागाचे नियंत्रक आर. एस. पांडे, आयएएस अधिकारी उज्ज्वलकुमार घोष यांच्या नेतृत्वामध्ये ही बैठक झाली. यावेळी जिल्हा पंचायतीचे मुख्य कार्यकारी अधिकारी हर्षल भोयर उपस्थित होते. ग्रामीण विकास पंचायतराज खात्याकडून या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी बेळगाव विभागात येणाऱ्या बेळगाव, बागलकोट, धारवाड, गदग, विजापूर, हावेरी, कारवार या जिल्ह्यातील जिल्हा पंचायतींच्या अधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये हजेरी लावली होती. जिल्ह्यानुसार जिल्हा पंचायतीकडून राबविण्यात आलेल्या विकासकामांचा आढावा घेण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत जिल्हा पंचायतीकडे असणारा निधी व शासनाकडून वितरित करण्यात आलेल्या निधीच्या खर्चाचा तपशील जाणून घेण्यात आला. ग्रामीण भागातील रस्ते, गटारी, स्वच्छता, कचरा विल्हेवाट, महसूल वसुली, ग्राम पंचायतींचा विकास, जलजीवन मिशन योजना आदी कामांची माहिती घेण्यात आली. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पाणी समस्येवर मात करण्यासाठी कोणत्या प्रकारे नियोजन करण्यात आले आहे, याची माहिती जाणून घेण्यात आली. जलजीवन मिशन योजनेंतर्गत राबविण्यात आलेल्या कामांची माहिती घेण्यात आली.
महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे
अनेक ठिकाणी कामांना विलंब होत असल्याबद्दल संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. पाणीपुरवठ्यासाठी नियोजन करण्याची सूचना अधिकाऱ्यांना करण्यात आली. सरकारने नवीन करप्रणाली जारी केली असून त्यानुसार कर आकारणीवर कोणत्या प्रकारे अंमलबजावणी होत आहे, याबाबतही अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यात आली. महसूल वाढीसाठी अधिकाऱ्यांनी अधिक लक्ष द्यावे, अशी सूचना करण्यात आली. विकासासाठी निधी देऊनही खर्च न झाल्याबद्दल अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. दरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांकडून तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याचे कारण सांगण्यात आले. त्या समस्या दूर करून निधीतून विकासकामे राबविण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.









