मुख्यमंत्र्यांचा आदेश
प्रतिनिधी /पणजी
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी गोवा राज्य पायाभूत साधन-सुविधा विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची बैठक घेतली आणि महामंडळातर्फे चालू असलेले सर्व प्रकल्प युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेश दिले. तसेच ते पूर्ण होण्याच्या दृष्टीने नवीन तारखा ठरवण्यात आल्या. दरम्यान, या महामंडळामार्फत एकही नवीन प्रकल्प हाती घेण्यात आला नसल्याचा खुलासा डॉ. सावंत यांनी त्या बैठकीतून केला.
महामंडळाच्या या बैठकीत सर्व चालू असलेल्या प्रकल्पांचा आढावा घेण्यात आला त्या प्रकल्पांना पुर्णत्वास नेण्यासाठी उशीर का झाला आणि होतोय यावरही चर्चा करण्यात आली. आरोग्य व शालेय क्षेत्रातील प्रकल्पांना प्राधान्य देवून ते पूर्ण करण्याचे ठरवण्यात आले आहे. प्रत्येक प्रकल्पासाठी पुरेशा निधीची तरतुद करण्यात आली असून ते प्रकल्प ठरवलेल्या तारखेस पूर्ण करावेत, असे डॉ. सावंत यांनी बजावले आहे. पणजीतील महामंडळाच्या कार्यालयात संचालक मंडळाची बैठक होऊन त्यात उपरोक्त निर्णय झाल्याची माहिती देण्यात आली. म्हपाशाचे आमदार जोशुआ डिसोझा हे महामंडळाच्या उपाध्यक्षपदाचा लवकरच ताबा घेतील असा खुलासा डॉ. सावंत यांनी केला आहे.









