अन्यथा तीव्र आंदोलन, ग्रा. पं. सदस्य संघटनेचा इशारा : जलजीवनची कामे दोन वर्षापासून सुरूच
खानापूर : तालुक्यात जलजीवन मिशन अर्थात जे. जे. एम. पाणी योजना पूर्णत: असफल झाली असून तालुक्यात सर्वत्र या जलजीवन मिशनची कामे निकृष्ट दर्जाची झाली आहेत. तसेच काही ठिकाणी कामे अर्धवट स्थितीत ठेवून कंत्राटदारांनी पलायन केले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजना कोलमडली असून ग्रामीण भागातील नागरिकांना पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. येत्या पंधरा दिवसात जे. जे. एम.ची कामे सुरू करून पाणीपुरवठा योजना पूर्ण केली नसल्यास उग्र आंदोलनाचा इशारा ग्राम पंचायत सदस्य संघटनेचे अध्यक्ष विनायक मुतगेकर यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिला आहे. तालुक्यात जलजीवन मिशन योजनेची कामे दोन वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहेत. मात्र सर्वच ठिकाणी ही कामे निकृष्ट आणि अर्धवट स्थितीत राहिल्याने याबाबत ग्रामपंचायत अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सदस्यांकडून जोरदार आक्षेप घेण्यात येत आहेत. याबाबत जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांना वेळोवेळी अर्ज विनंत्या करुनदेखील कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही.
सर्व सीसी रस्ते उद्ध्वस्त
याबाबत माहिती अशी की, केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या सहयोगातून जलजीवन मिशन पाणी योजना राबविण्यात येत आहे. तालुक्यात सर्वच ग्रामपंचायत क्षेत्रात ही पाणी योजना राबवण्यासाठी काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी गावातील चांगले सीसी रस्ते फोडून नव्याने पाईपलाईन घालण्यात आली आहे. सीसी रस्ते फोडल्यानंतर पुन्हा नव्याने करणे हे क्रमप्राप्त होते. मात्र सर्वच ग्रामीण भागात जे. जे. एम.च्या नावाखाली रस्ते फोडण्यात आले आहेत. त्यामुळे सर्व सीसी रस्ते उद्ध्वस्त झालेले आहेत. त्यामुळे गावातील वाहतुकीच्या अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील पाणीपुरवठा यंत्रणाच कोलमडलेली आहे.
नळपाणी योजना कोलमडली
परिणामी ग्रामीण भागातील महिलांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. जे. जे. एम.ची कामे अर्धवट स्थितीत तसेच निकृष्ट दर्जाची होत असताना पाहून अनेक ग्रामपंचायत अध्यक्ष, सदस्यांनी या विरोधात अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली. मात्र या तक्रारीची दखल अजिबात घेतली नाही. कंत्राटदारांची बिले मात्र वेळोवेळी काढलेली आहेत. त्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदाराचे आर्थिक साठेलोटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्यात सर्वत्र नळपाणी योजना कार्यान्वित होती. मात्र जलजीवन मिशन योजनेंतर्गत शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी योजना आखण्यात आली. आणि घरोघरी नळ देवून मिटरद्वारे पाणीपुरवठा करण्याची योजना आहे. यासाठी गावागावात नव्याने पाईपलाईन घालून प्रत्येक घराला नळ देण्यात आला आहे. मात्र सर्वच ठिकाणी या योजनेची कामे अर्धवट स्थितीत आहेत. त्यामुळे पाणी योजनाच कोलमडली असून ग्रामीण नागरिकांना पाण्यासाठी हाल होत आहेत. याबाबत कापोली ग्रा. पं. चे अध्यक्ष संदीप देसाई यांनीही आवाज उठविला असून कापोली ग्रा. पं. क्षेत्रातील जे. जे. एम.ची कामे अर्धवट स्थितीत आहेत, असे सांगितले.
अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याचा आरोप
याबाबत ग्राम पंचायत प्रतिनिधीनी जलजीवन मिशनचे अधिकारी प्रविण मठपती यांना अर्जविनंत्या करुनदेखील कोणतीच कारवाई अथवा पाणीपुरवठा पूर्ण करण्यासाठी कंत्राटदारावर दबाव टाकण्यात आलेला नाही. काही ठिकाणी तर काम अर्धवट स्थितीत असताना बिले काढून कंत्राटदारानी पळ काढलेला आहे. त्यामुळे अधिकारी आणि कंत्राटदार यांच्यात संगनमत असल्याचा आरोप ग्राम पंचायत सदस्य संघटनेकडून करण्यात येत आहे.सर्वच ठिकाणी कामे अर्धवट व निकृष्ट झाल्याने ही योजनाच फसली गेली असून यात अधिकारी मात्र गब्बर झालेले आहेत. यासाठी ग्रामपंचायत अध्यक्षांनी याबाबत आवाज उठवला असून येत्या पंधरा दिवसात जर जे.जे.एम.ची कामे सुरळीत आणि पूर्ण झाली नसल्यास उग्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामपंचायत सदस्य संघटनेच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे.









