खासदार जगदीश शेट्टर यांच्या जिल्हा प्रशासन-महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना सूचना : बेळगाव-धारवाड रेल्वेसाठी भूसंपादन सुरू
बेळगाव : हलगा-मच्छे बायपास रस्त्याचे काम गतीने सुरू आहे. या रस्त्याला काही शेतकऱ्यांनी विरोध दर्शविला होता. मात्र तो प्रश्न निकाली काढण्यात आला आहे. शहरात होणारी वाहतूक कोंडी पाहता बायपास रस्ता महत्त्वाचा ठरत आहे. या महामार्गाचे काम डिसेंबर अखेरपर्यंत पूर्ण करावे, अशा सूचना खासदार जगदीश शेट्टर यांनी जिल्हा प्रशासन व महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात हलगा-मच्छे बायपास, रिंगरोड, बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्गाच्या भूसंपादनासाठी बैठक झाली. या बैठकीदरम्यान खासदार शेट्टर यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या. रामनगर-लोंढा या दरम्यान वाहतुकीची कोंडी होत असून ती लवकर सोडवावी, अशी सूचना त्यांनी केली. त्याचबरोबर विमानतळ, रेल्वे या प्रकल्पांबाबत माहिती जाणून घेतली. सौंदत्ती यल्लम्मा देवस्थानला मंजूर झालेल्या 100 कोटी निधीच्या विनियोगाबद्दल सविस्तर चर्चा झाली.
जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन म्हणाले, रिंगरोडसाठी आवश्यक असलेल्या 400 एकर जमिनीचे भूसंपादन करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. 15 मार्चपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून रिंगरोडच्या कामाला लवकरच सुरुवात केली जाईल, असे त्यांनी सांगितले. बेळगाव-धारवाड रेल्वे मार्गासाठी वाढीव जमीन घेण्याबाबत चर्चा झाली. आता 870 एकर जमीन घेतली जाणार असून के. के. कोप्प येथे भूसंपादन सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. बैठकीला राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे भुवनेशकुमार, बेळगाव विमानतळ संचालक त्यागराजन, विशेष भूसंपादन अधिकारी राजश्री जैनापुरे, प्रांताधिकारी भूसंपादन बलराम चव्हाण, रेल्वे अभियंता निसामुद्दीन यासह केआयएडीबीचे अधिकारी उपस्थित होते.









