कमिटीतर्फे आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे मागणी
वार्ताहर/हलशी
नंदगड येथील ग्रामदेवता महालक्ष्मी यात्रा फेब्रुवारी महिन्यात होणार आहे. मागील सहा महिन्यापासून गावात अनेक धार्मिक विधी कार्यक्रम उत्सवाप्रमाणे साजरे करण्यात येत आहेत. मात्र नंदगड गावच्या समस्या सोडवण्यासाठी तसेच गावच्या विकासासाठी नंदगड ग्राम पंचायतीकडून विकासाच्या बाबतीत कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे नागरिकांतून तातडीने विकासकामे हाती घेण्यात यावीत, अशी मागणी होत आहे. यात्रेपूर्वी गावातील रस्ते, विद्युत पुरवठा सोय करणे, सार्वजनिक स्वच्छता ठेवणे, सांडपाण्याची व्यवस्था करणे, पिण्याच्या पाण्याचा पुरवठा, गावचा बाजार, यांचे नियोजन करणे गरजेचे होते. ग्राम पंचायत अंतर्गत येणारे निधी व शासनाकडून येणारी निधी यांचा योग्य त्या ठिकाणी वापर करणे गरजेचे आहे.
कामे यात्रेपूर्वी करण्याचे आश्वासन
मात्र नंदगड ग्रा. पं. कडून याबाबत कोणतेही ठोस कार्यक्रम हाती घेण्यात आले नाहीत. यासाठी यात्रा कमिटी अध्यक्ष सुभाष पाटील, ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव व यात्रा कमिटीच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आमदार विठ्ठल हलगेकर यांची भेट घेऊन यात्रेपूर्वी गावातील विकासकामांची पूर्तता करावी, तसेच बाजार पेठ येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवणे, नंदगड धरणाचे पाणीपुरवठा योजना आखली होती. पण अद्याप याबाबत कोणतेही नियोजन केलेले नाही. अशा गावच्या विविध समस्या आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडे मांडल्या. सर्व समस्या संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून यात्रेपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. यावेळी सुभाष तुकाराम पाटील, यल्लाप्पा गुरव, राजेंद्र कब्बूर, शंकर सोनोळी, युवा कार्यकर्ते रोहित गुरव, महादेव हलशीकर इत्यादींनी गावातील अनेक समस्यांवर आपले विचार मांडून चर्चा केली. आमदार व ग्रामपंचायत नंदगड यांना लवकरात लवकर काम पूर्ण करण्याचे सांगण्यात आले.









