तहसीलदारांची ग्रा. पं. साहाय्यकांना सूचना
प्रतिनिधी / बेळगाव
बेळगाव तालुक्यातील गावांमध्ये सेवा बजावणाऱ्या ग्राम साहाय्यकांनी नागरिकांची कामे वेळेत पूर्ण करावीत, शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्यास विलंब करण्यात येऊ नये, तत्पर सेवा देण्यात यावी, अशा सूचना तहसीलदार बसवराज नागराळ यांनी ग्राम साहाय्यकांना केल्या.
तालुका तहसीलदार म्हणून बसवराज नागराळ यांनी नुकताच कार्यभार हाती घेतला आहे. या पार्श्वभूमीवर तालुक्यातील ग्राम साहाय्यकांच्या बैठकीचे आयोजन तहसीलदार कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. तालुक्यातील उचगाव, काकती, हिरेबागेवाडी व बेळगाव या तहसीलदार कार्यालयाच्या विभागीय कार्यालयामध्ये कार्यरत असणाऱ्या ग्राम साहाय्यकांची बैठक बोलाविण्यात आली होती. यावेळी कर्मचाऱ्यांना तहसीलदारांनी महत्त्वाच्या सूचना केल्या.
ग्रामीण भागात सेवा देण्याचे कार्य साहाय्यकांकडून केले जाते. याठिकाणी येणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांना योग्यप्रकारे वागणूक देण्यात यावी, ग्राम पंचायत सदस्यांशी सौहार्दपूर्ण संबंध ठेवून कामे वेळेत पूर्ण करावीत, ग्राम साहाय्यकांच्या चांगल्या कामामुळे तहसीलदारांना मान मिळतो. याची जबाबदारी प्रत्येकांवर आहे, असे तहसीलदार नागराळ यांनी सांगितले. यावेळी ग्राम साहाय्यक कर्मचारी संघटनेतर्फे तहसीलदारांना पुष्पगुच्छ, शाल देऊन स्वागत करण्यात आले.









