खासदार मंगला अंगडी यांची रेल्वेमंत्र्यांकडे मागणी
बेळगाव : बेळगाव-धारवाड व्हाया कित्तूर रेल्वेमार्ग मागील अनेक वर्षांपासून रखडला असून हा रेल्वेमार्ग जलदगतीने पूर्ण करावा, तसेच बेळगाव-पंढरपूर व बेळगाव-शबरीमलय या ठिकाणी रेल्वेसेवा सुरू करावी, अशी मागणी खासदार मंगला अंगडी यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. खासदार मंगला अंगडी यांनी दिल्ली येथे केंद्रीय रेल्वेमंत्र्यांची भेट घेऊन बेळगाव परिसरातील रेल्वेसेवांविषयी चर्चा केली. काही दिवसात अयोध्या येथे राममंदिराचे उद्घाटन होणार असून, त्यामुळे बेळगाव ते अयोध्या या मार्गावर एक्स्प्रेस सुरू करावी, बेळगाव हे एक धार्मिक शहर असून पंढरपूरच्या विठुरायाचे मोठ्या प्रमाणात भक्त आहेत. त्यामुळे बेळगाव-पंढरपूर मार्गावरील रेल्वेसेवा पूर्ववत करावी. तसेच केरळ येथील शबरीमलय देवस्थानाला एक्स्प्रेस सुरू करण्याची मागणी त्यांनी केली आहे. याबरोबरच बेळगावमध्ये स्वत:च्या जागेमध्ये 5 हजार चौरस फूट जागेत प्रशस्त पोस्ट इमारत बांधण्यासाठी अनुदान मंजूर करण्याची मागणी त्यांनी रेल्वेमंत्र्यांकडे केली आहे.









