प्लास्टिकमधून रुग्णांना खाऊ घेऊन येणाऱ्यांवर निर्बंध : गृहरक्षक जवानांना सूचना
बेळगाव : सिव्हिल हॉस्पिटल परिसर प्लास्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने बिम्स प्रशासनाने कडक धोरण अवलंबिले आहे. प्लास्टिक पिशवीमधून जेवण व अल्पोपाहार घेऊन येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना आत प्रवेश देण्यात येऊ नये, अशी नोटीस जिल्हा शल्यचिकित्सक व वैद्यकीय अधीक्षकांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये तैनात असलेल्या गृहरक्षक जवानांना जारी केली आहे. तसेच नोटीस बोर्डवरही ती लावण्यात आली आहे. प्लास्टिकचा वापर कमी व्हावा, यासाठी जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र अद्यापही प्लास्टिकवर नियंत्रण मिळविण्यास म्हणावे तसे यश आलेले नाही. राज्य सरकारने विशेषकरून मुख्यमंत्र्यांनी प्लास्टिकची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यासह वापर टाळावा, असा आदेश बजावला आहे. सिंगल यूज प्लास्टिकवर देशात 2022 पासून बंदी घालण्यात आली आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणासह मानवी जीवनावर त्याचा विपरित परिणाम होत आहे. त्यामुळे पर्यावरणाचा वाढता ऱ्हास रोखण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा कार्यरत आहे.
महानगरपालिकेकडून सातत्याने प्लास्टिक विक्री करणाऱ्या दुकानांवर कारवाई करून मोठ्या प्रमाणात सिंगल यूज प्लास्टिक जप्त केले जात आहे. कापडी पिशव्यांचा वापर करण्यात यावा, याबाबत जनजागृती केली जात आहे. पण अद्यापही प्लास्टिक वापराबाबत नागरिकांमध्ये म्हणावी तशी जनजागृती झाली नसल्याचे दिसून येत आहे. परिणामी शहरात ओल्या व सुक्या कचऱ्याबरोबरच प्लास्टिकच्या कचऱ्याची समस्याही गंभीर बनत चालली आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये रुग्णांना भेटावयास येणारे नातेवाईक प्लास्टिक पिशवीतून जेवण व अल्पोपाहार घेऊन येण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे एक पाऊल प्लास्टिक मुक्तीकडे या अभियानांतर्गत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये प्लास्टिकवर बंदी घालण्यात आली आहे. सिव्हिल परिसर प्लास्टिक मुक्त करण्याच्या उद्देशाने, देशाच्या हितासाठी आणि हरित पर्यावरणाला चालना देण्यासाठी सिव्हिल हॉस्पिटल परिसरात प्लास्टिकवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे प्लास्टिक पिशवीतून खाऊ घेऊन येणाऱ्यांना प्रवेश देण्यात येऊ नये, अशी सूचना एका नोटिसीद्वारे बिम्स प्रशासनाने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कार्यरत असलेल्या होमगार्डना दिली आहे.









