ग्रामीण पाणीपुरवठा खात्याचे संचालक नागेंद्र प्रसाद यांनी साधला संवाद
बेळगाव : बेळगाव जिल्ह्यामध्ये हाती घेण्यात आलेल्या बहुग्राम पाणीपुरवठा योजनांची अंमलबजावणी करण्यात विलंब करण्यात येऊ नये. अन्यथा, संबंधित कंत्राटदारांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ग्रामीण पाणीपुरवठा आणि नैर्मल्य खात्याचे संचालक नागेंद्र प्रसाद यांनी दिला. बेंगळूर येथील ग्रामीण पाणीपुरवठा आणि नैर्मल्य खात्याच्या केंद्र कार्यालयातून बेळगाव जिल्हा बहुग्राम पाणीपुरवठा योजनेच्या समन्वय अधिकाऱ्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून ते बोलत होते. यावेळी जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांनी बेळगाव ग्रामीण पिण्याचे पाणी आणि नैर्मल्य विभागांतर्गत 4 आणि चिकोडी विभागांतर्गत 9 बहुग्राम पाणीपुरवठा योजना प्रगतिपथावर आहेत.
या योजना राबविण्यात विलंब होऊ नये यासाठी संबंधितांना सूचना करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले. या योजनेच्या अंमलबजावणीनंतर बेळगाव जिल्हा टँकरमुक्त जिल्हा होण्यास सहकार्य मिळणार आहे. पिण्याच्या पाण्याची समस्या अथणी, रायबाग, चिकोडी या तालुक्यांमध्ये निर्माण होत आहे. या योजनेंतर्गत ही समस्या दूर होणार आहे. या योजनांसाठी नकाशा तयार करण्यात आला असून याला अनुमोदन देण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली. यावेळी खात्याचे संचालक नागेंद्र प्रसाद यांनी प्रतिसाद देत योजना वेळेत पूर्ण करण्याची सूचना केली. यावेळी मुख्य अभियंता इजाज हुसेन, कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा आणि नैर्मल्य खात्याचे बेळगाव व चिकोडी विभागांचे अधिकारी, कंत्राटदार, कर्मचारी उपस्थित होते.









