बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना
बेळगाव : गणेशोत्सव आता काही दिवसांवर येवून ठेपला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची दुरुस्ती करणे महत्त्वाचे आहे. याचबरोबर मिरवणूक मार्गावरील येणारे अडथळेदेखील दूर झाले पाहिजेत. यासाठी यापूर्वी झालेल्या सार्वजनिक बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या होत्या. मात्र अजूनही त्याबाबत कोणतेच पाऊल उचलण्यात आले नाही. त्यामुळे बुधवारी झालेल्या बांधकाम स्थायी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना पुन्हा सूचना करण्यात आल्या असून तातडीने कामाला सुरुवात करा, असे या समितीच्या अध्यक्षा वाणी जोशी यांनी सांगितले. बेळगावचा गणेशोत्सव हा मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. त्यामुळे याकाळात रस्ते तसेच इतर समस्या दूर करणे गरजेचे आहे. तेव्हा तातडीने त्यासाठी पाऊल उचला, असे सांगितले. याचबरोबर काही ठिकाणी बांधकामांचे अतिक्रमण सुरू आहे. अतिक्रमण करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी काही नगरसेवकांनी केली. त्यावर अध्यक्षांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने ती कामे थांबवावीत, असे सांगितले.
यावेळी महापालिकेचे कायदा सल्लागार अॅड. उमेश महांतशेट्टी यांनी येणाऱ्या अडचणींबाबतची माहिती दिली. काहीजण न्यायालयात जाऊन स्थगिती घेऊन येतात. त्यामुळे आम्हाला समस्या निर्माण होत आहे. काम सुरू झाल्यानंतर तातडीने अधिकाऱ्यांनी संबंधितांवर कारवाई केली तर सोपे जाणार आहे, असे सांगून कायद्यामध्ये असलेल्या तरतुदींची माहिती त्यांनी दिली. बऱ्याच ठिकाणी गटारी तसेच इतर कामे अर्धवट स्थितीत आहेत. ती कामे पूर्ण करावीत, अशी मागणी नगरसेवकांनी केली. याचबरोबर काही ठिकाणी रस्त्यांवरूनच अजूनही ड्रेनेजचे पाणी वाहत आहे. त्यामुळे ड्रेनेजची असलेली समस्याही दूर करण्याची मागणी केली आहे. अधिकारी गांभीर्याने लक्ष देण्यास तयार नाहीत. त्यामुळे शहरामध्ये अर्धवट कामे आहेत, असे सांगण्यात आले. त्यावर गणशोत्सवापूर्वी सर्व कामे पूर्ण करावीत, असे या बैठकीत अध्यक्षांनी सांगितले.









