प्रतिनिधी/ बेळगाव
मागील दोन महिन्यांत वीजबिलांमध्ये भरमसाट वाढ झाल्याने याचा परिणाम हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीत दिसून आला. तक्रार निवारण बैठकीत सर्वाधिक तक्रारी वाढीव वीजबिलाच्याच होत्या. त्यामुळे हेस्कॉमचे कर्मचारी व अधिकाऱ्यांचीही ग्राहकांना उत्तर देताना त्रेधा उडत आहे.
प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हेस्कॉमच्या उपविभाग कार्यालयांमध्ये तक्रार निवारण बैठकीचे आयोजन केले जाते. या बैठकीमध्ये ग्राहकांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातात. नावात बदल, वाढीव वीजबिल, मीटरमधील बिघाड, कमी विद्युतदाब यासह इतर समस्या बैठकीत मांडल्या जातात. संबंधित उपविभागातील साहाय्यक कार्यकारी अभियंते या बैठकीला उपस्थित होते.
हेस्कॉमने मागील दोन महिन्यांच्या वीजबिलात भरमसाट वाढ केली. एफएसी व इतर दरांमध्ये वाढ करण्यात आल्याने वीजबिल 50 ते 60 टक्के अधिक आले. मागील महिन्यात बिल भरल्यानंतर या महिन्यात बिल कमी येईल, या आशेवर असणाऱ्या ग्राहकांची भरमसाट बिलामुळे साफ निराशा झाली आहे. या महिन्यातही भरमसाट बिल आल्याने नागरिकांनी हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीत तक्रारी दाखल केल्या.
वीजदरवाढीसोबतच विद्युतखांब बदलणे, ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती अशा तक्रारी मांडण्यात आल्या. शहर उपविभाग-1 मध्ये संजीव हम्मण्णावर, शहर उपविभाग-2 मध्ये विनोद करुर, शहर उपविभाग-3 मध्ये ए. एम. शिंदे, याचबरोबर ग्रामीण भागातील उपविभागांमध्ये बैठका घेण्यात आल्या.









