वेळच्या वेळी निरसन करण्याच्या अधिकाऱ्यांच्या सूचना
बेळगाव : उन्हाळ्याला सुरुवात होताच विजेच्या मागणीत वाढ झाली. परंतु, त्याच मानाने तक्रारींमध्येही वाढ झाल्याचे शनिवारी आयोजित बैठकीत दिसून आले. वाढीव वीजबिल, लोंबकळणाऱ्या वीजवाहिन्या यासह इतर तक्रारी बैठकीत मांडण्यात आल्या. वेळच्या वेळी तक्रारींचे निरसन करावे, अशा सूचना हेस्कॉमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या. प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी हेस्कॉमच्या तक्रार निवारण बैठकीचे आयोजन केले जाते. शनिवारी शहरासह ताल्क्यातील उपकेंद्रांवर तक्रार निवारण बैठक झाली. उष्णतेत वाढ झाल्याने विजेचा वापर वाढू लागला आहे. त्यामुळे वीजबिल वाढत असल्याचे हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. परंतु, काही ग्राहकांचे तिप्पट बिल आल्याने त्यांच्या मीटरची तपासणी करण्याची सूचना करण्यात आली. शहराच्या मध्यवर्ती भागातील खंजर गल्ली, खडेबाजार, पांगुळ गल्ली या भागात वारंवार वीजपुरवठा खंडित केला जात असल्याची तक्रार करण्यात आली. याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या जातील, असे सांगण्यात आले. बैठकीला साहाय्यक कार्यकारी अभियंत्या सुमंगला बजंत्री, ए. एम. शिंदे, संजीव सुखसारे यासह इतर अधिकारी उपस्थित होते.









