55 जणांनी मांडले गाऱ्हाणे, कारवाईची सूचना
प्रतिनिधी/ बेळगाव
जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील यांच्या फोन ईन कार्यक्रमाला शनिवारी उत्तम प्रतिसाद मिळाला. यावर्षाचा हा पहिला फोन ईन कार्यक्रम असून सकाळी 11 ते दुपारी 1.15 पर्यंत पोलीस प्रमुखांनी सुमारे 55 जणांचे फोन घेतले. त्यांचे गाऱ्हाणे ऐकले. बेळगाव शहर व तालुक्यातूनही 18 जणांनी पोलीस प्रमुखांना फोन करून आपल्या तक्रारी सांगितल्या.
महिन्यातील दुसरा शनिवार सरकारी कार्यालयांना सुटी असते. यातच भोगी व संक्रांतीच्या सुटीच्या मूडमध्ये सरकारी यंत्रणा असतानाच पोलीस प्रमुखांनी मात्र पोलीस दलाची प्रतिमा जनमाणसांत उंचाविण्यासाठी फोन ईन कार्यक्रम घेतला. फोन करणाऱ्या प्रत्येकांशी संयमाने चर्चा करून त्यांचे गाऱ्हाणे ऐकले. आपल्या अधिकाऱ्यांना कारवाई करण्याची सूचना त्यांनी केली.
यावेळी जिल्हा सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. ग•sकर, शरणबसाप्पा आजूर, महादेव एस. एम., बाळाप्पा तळवार, विठ्ठल मादर आदी अधिकारी उपस्थित होते. जाहीर केल्याप्रमाणे सकाळी 11 वाजता पोलीस प्रमुखांनी फोन कॉल स्वीकारण्यास सुरुवात केली. ‘हॅलो मी एसपी बोलतो’ असे प्रत्येक कॉलला प्रतिसाद देत पोलीस प्रमुखांनी नागरिकांचे गाऱ्हाणे ऐकले.
दुपारी 1.15 पर्यंत त्यांनी फोन कॉल स्वीकारले. केवळ बेळगाव जिल्हाच नव्हे तर गदग व तुमकूर जिल्ह्यातूनही नागरिकांचे कॉल आले. त्यांनी गदग जिल्ह्यात सुरू असलेली बेकायदा वाळू वाहतूक व तुमकूर जिल्ह्यातील कुणीगल येथील जमीनवादासंदर्भात पोलिसांकडे संबंधितांनी तक्रारी केल्या. यूट्युब पत्रकारांकडून होणाऱ्या त्रासाबद्दलही मुडलगी तालुक्यातील औरादी येथून तक्रार करण्यात आली असून अधिकाधिक तक्रारी बेकायदा दारूविक्री, वाळू वाहतूक व रेशन तांदळाच्या तस्करीविषयी करण्यात आल्या आहेत.
निपाणी, रामदुर्ग, गोकाक, अथणी, हुक्केरी, रायबाग, खानापूर, कागवाड परिसरातून फोन आले. कौटुंबिक वाद, जमीनवाद, आर्थिक व्यवहार, पीकहानी, बेकायदा तांदूळ वाहतूक, बँकेच्या नावाने केलेली फसवणूक, चोरी प्रकरणे, बेकायदा दारूविक्री, बेकायदा वाळू वाहतूक आदींविषयी पोलीस प्रमुखांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. यावेळी काही पोलिसांच्या आर्थिक व्यवहारासंबंधीही नागरिकांनी तक्रारी केल्या.
शहर-तालुक्यातूनही 18 फोन
जिल्हा पोलीस प्रमुखांच्या फोन ईन कार्यक्रमात केवळ जिल्ह्यातून नव्हे तर बेळगाव शहर व तालुक्यातील 18 जणांनी पोलीस प्रमुखांना फोन करून आपले गाऱ्हाणे मांडले. जमीनवाद, आर्थिक व्यवहार, रस्त्यावरील अतिक्रमण, रिक्षा स्टॅण्डसंबंधीच्या समस्या, पार्किंग आदींबरोबरच फसवणूक प्रकरणासंबंधी तक्रारी करण्यात आल्या. वाहतुकीच्या समस्या व पहिल्या रेल्वेगेटजवळील बॅरिकेड्स हटविण्याची मागणीही पोलीस प्रमुखांकडे करण्यात आली आहे. या समस्या पोलीस आयुक्तांच्या निदर्शनास आणून देण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.









