बेकायदेशीर मद्यविक्रीविरोधात संयुक्त कारवाईचे आश्वासन
बेळगाव : जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी घेतलेल्या फोन ईन कार्यक्रमात जिल्ह्यातून 26 जणांनी फोन करून तक्रारी दाखल केल्या. यामध्ये अथणी, चिकोडी, बैलहोंगल तालुक्यात सुरू असलेल्या बेकायदा मद्यविक्रीविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. यावेळी दाखल करण्यात आलेल्या तक्रारींवर त्वरित कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. काही तक्रारी जमीनवादासंदर्भात करण्यात आल्या आहेत. या तक्रारी न्यायप्रविष्ठ असून न्यायालयात दाद मागण्याची सूचना पोलीस अधिकाऱ्यांनी केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी सायबर गुन्ह्यांबाबत तक्रारी वाढत असल्याचे सांगितले. तर बेकायदेशीर मद्यविक्री विरोधात तक्रारी वाढल्या असून पुढील फोन ईन कार्यक्रमामध्ये अबकारी खात्याच्या अधिकाऱ्यांना घेऊन कार्यक्रम राबविण्यात येईल. यावेळी दाखल होणाऱ्या तक्रारींवर अबकारी व पोलिसांच्या सहयोगाने कारवाई करण्यात येईल. सध्या दाखल करण्यात आलेल्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे सांगितले. खोटी कागदपत्रे तयार करून जमिनी लाटण्याचे प्रकार सुरू आहेत. असे करणे कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे असे प्रकार घडल्यास संबंधितांवर गुन्हा दाखल करू, असेही पोलीस प्रमुख डॉ. गुळेद यांनी सांगितले. यावेळी अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख आर. व्ही. बसरगी, पोलीस कर्मचारी श्रीशैल बिरादार, सुरेश बेडगुंबळ, लक्ष्मी बिरादार आदी उपस्थित होते.









