महापालिका आयुक्तांची भेट घेऊन विचारला जाब
बेळगाव : लिंगायत स्मशानभूमीच्या विकासासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र या निधी अंतर्गत अर्धवट विकासकामे राबविण्यात आली आहेत. येथील निधी अन्यत्र खर्च केल्याचा आरोप करत याबाबतचा जाब स्मशानभूमी सुधारणा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांना विचारला. रखडलेली विकासकामे तातडीने पूर्ण करा, अशी मागणी केली. लिंगायत स्मशानभूमीच्या विकासाकडे महापालिका प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. स्मशानभूमीत अनेक समस्या भेडसावत असून, या ठिकाणी दिवे, पाण्याची व्यवस्था तसेच अन्य सुविधा नसल्याने अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांना समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्मशानभूमीच्या विकासासाठी 96 लाखाचा निधी मंजूर करण्यात आला होता. मात्र या अंतर्गत अर्धवट कामे करण्यात आली आहेत. याबाबत कंत्राटदाराकडे विचारणा केली असता मंजूर झालेल्या निधीचा विनियोग अन्यत्र करण्यात आल्याचे सांगितले. त्यामुळे लिंगायत स्मशानभूमी सुधारणा मंडळ तसेच सामाजिक कार्यकर्ते सुजित मुळगुंद, राजू टोपण्णावर, बार असोसिएशनचे अध्यक्ष प्रभू यत्नट्टी यांच्यासह कार्यकर्त्यांनी सोमवारी महापालिका आयुक्त रूद्रेश घाळी यांची भेट घेतली. तसेच स्मशानभूमीच्या विकासासाठी मंजूर झालेला निधी अन्यत्र का वळविला, याबाबतचा जाब विचारला. या निधीमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप देखील करण्यात आला. मात्र महापालिका आयुक्तांनी आरोपाबाबत आक्षेप घेत मंजूर झालेल्या निधी अंतर्गत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही, असे स्पष्ट केले. विकासकामे पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. स्मशानभूमीतील समस्यांचे निवारण करण्यासाठी आवश्यक कारवाई करावी, तसेच रस्ते, पथदीप आणि पाण्याची व्यवस्था करावी, अशी विनंती महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली. स्मशानभूमीची पाहणी करून विकासासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे आयुक्तांनी सांगितले. सध्या आचारसंहिता असल्याने निधीची तरतूद करता येत नाही. मात्र निवडणुकीनंतर कामे करण्यात येतील, असे सांगितले.









