विरोधी गटाकडून महापौरही तितकेच दोषी असल्याचा पवित्रा
प्रतिनिधी/ बेळगाव
महापालिकेकडून नगर प्रशासन संचालनालयाला चुकीची तारीख नोंद करून अहवाल पाठविल्याबद्दल महापालिकेतील सत्ताधारी गटाने महापालिका आयुक्तांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावर महापौर शोभा सोमनाचे यांची स्वाक्षरी असल्याने सत्ताधारी गटाचेच नगरसेवक अडचणीत आल्याचे महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये दिसून आले. या प्रकारामुळे महापालिकेमध्ये मोठा गोंधळ उडाला.
शनिवारी महापालिकेच्या सभागृहामध्ये सर्वसाधारण सभा घेण्यात आली. ही सभा आयोजित करण्यामागचा उद्देश म्हणजे महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांना कोंडीत पकडण्याचाच होता. मात्र, विरोधी गटाच्या नगरसेवकांनी तसेच आमदार राजू सेठ यांनी नगर प्रशासन संचालनालयाकडे पाठविलेल्या नोटिसीवर महापौरांनी सही कशी केली? असा प्रश्न उपस्थित केला. यावर सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी ‘त्यांनी सही केली तरी आयुक्तांनी लक्ष देणे गरजेचे होते’ असे म्हणत सकाळच्या सत्रामध्ये महापालिका आयुक्तांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला होता.
प्रारंभी महापौर शोभा सोमनाचे यांनी सभागृहामध्ये महापालिकेला आलेल्या नोटिसीबाबत चर्चा करण्याचा विषय मांडला. विषय मांडताच सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी नगर प्रशासन संचालनालयाकडे पाठविण्यात आलेल्या नोटिसीवर 2024-25 सालचा उल्लेख करण्यात आला आहे. हा उल्लेख जाणूनबुजून करण्यात आल्याचा आरोप सत्ताधारी गटनेते राजशेखर डोणी यांनी केला. 16 सप्टेंबर 2023 रोजी सर्वसाधारण सभा झाली. त्यामध्ये आम्ही सरकारच्या आदेशानुसार 3 ते 5 टक्के करवाढीचा ठराव मंजूर केला होता. मात्र, 2023-24 ऐवजी 2024-25 असा उल्लेख करून प्रस्ताव पाठविण्यात आल्यामुळे ही नोटीस आम्हाला आली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्यावर वारंवार प्रश्नांचा भडिमार करण्यात आला. यावेळी त्यांनी स्थायी समितीच्या सभागृहामध्ये ठराव झाल्यानंतर महापौर शोभा सोमनाचे यांची स्वाक्षरी घेऊन तो प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. महापालिका उपायुक्त तसेच सभागृह सेक्रेटरी यांच्याकडे मी पाठपुरावा करूनच तो प्रस्ताव पाठविला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, ‘तुम्ही 2023-24 की 2024-25 असा उल्लेख केला’ याचे उत्तर सभागृहात द्या, म्हणून आग्रह धरला. त्यावर महापालिका आयुक्तांनी 2024-25 चा उल्लेख करून पाठविण्यात आल्याचे स्पष्ट केले.
त्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करावी आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांनी केली. त्याला विरोधकांनी कडाडून विरोध केला. आयुक्तांइतकेच महापौरही जबाबदार असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले. त्यामुळे बराच वेळ गोंधळ उडाला. त्यानंतर दुपारी सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब केल्याचे महापौर शोभा सोमनाचे यांनी सांगितले.









