मात्र पक्षाशी बांधील राहून काम करणार : निजदच्या ज्येष्ठ नेत्यांची पत्रकार परिषदेत माहिती
खानापूर ; जेडीएसचे खानापूर मतदारसंघाचे उमेदवार नासीर बागवान यांच्या विरोधात पक्षातील ज्येष्ठ नेत्यांमध्ये तसेच कार्यकर्त्यांमध्ये त्यांच्या कार्यपद्धतीवर असंतोष पसरला असून याबाबत चार दिवसापूर्वी पक्षातून बाहेर पडण्याचा इशारा दिला होता. मात्र कुमारस्वामी यांच्या सुचनेनुसार पक्षात राहून बांधीलकी जपत काम करणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली. पत्रकार परिषदेत बोलताना जेडीएसचे ज्येष्ठ नेते व जिल्हा उपाध्यक्ष अॅङ एच. एन. देसाई म्हणाले, नासीर बागवान यांना उमेदवारी दिल्यानंतर आम्ही त्यांचे अभिनंदन केले. आणि प्रचारात सक्रिय झालो. मात्र नासीर बागवान हे माझ्यासह ज्येष्ठ नेत्यांना व कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक बाजूला सारुन आपण कार्य करत आहेत. त्यांच्या या कार्यपद्धतीमुळे नाराज आहोत. तालुक्यात यावेळी जेडीएसला विजयासाठी पोषक वातावरण आहे. यासाठी आम्ही तळमळीने कार्य करत आहोत. मात्र बागवान हे जाणीवपूर्वक ज्येष्ठ व प्रामाणिक कार्यकर्त्यांना डावलत आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांत असंतोष व नाराजी पसरली आहे. याबाबत पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी आणि सी. एम. इब्राहिम यांच्याशी याबाबत चर्चा केली. त्यावेळी यांनी आपण बागवान यांना वर्तन सुधारण्यास सांगू, आपण पक्षाशी बांधील राहून कार्य करावे, असे सांगण्यात आल्याने आम्ही पक्षातून बाहेर पडणार नाही. मात्र बागवान यांनी आपले वर्तन सुधारावे, अन्यथा आम्हाला वेगळा विचार करावा लागेल, असे सांगितले. यावेळी रेवणसिद्धय्या हिरेमठ, फारुक नाईक, नगरसेविका मेघा कुंदरगी, शिवानंद बागेवाडकर यांनीही तीव्र प्रतिक्रिया पत्रकारांसमोर व्यक्त केल्या. यावेळी कार्यकर्ते रफिक वारीमणी, शंकर सोनोळी, अलीम नाईक, रियाज बस्तवाडकर, माजी नगराध्यक्ष बसप्रभू हिरेमठ, रघुनाथ देसाई, राजू खातेदार, नसरीनबानू तिगडी व कार्यकर्ते सहभागी होते.