समर्थनगर येथील दोन व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
बनावट उताऱयांचा शोध घेण्यासाठी मनपाच्या अधिकाऱयांनी मार्केट पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. केवळ साधी तक्रार असे त्याचे स्वरूप असून बुधवारी रात्रीपर्यंत यासंबंधी एफआयआर दाखल झाला नाही.
बनावट उतारे तयार करून भूखंडांची केलेली विक्री ठळक चर्चेत आल्यानंतरही अधिकाऱयांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली नसल्याचे दिसून येते. मनपाचे महसूल निरीक्षक अमित यळकार यांनी बुधवारी मार्केट पोलीस स्थानकात फिर्याद दिली असून समर्थनगर येथील दोन व्यवहारांची चौकशी करण्याची मागणी केली आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे उतारे तयार करून भूखंडांचे पीआयडी क्रमांक देऊन व्यवहार केले आहेत. सुरुवातीला मनपा आयुक्तांनी अधिकाऱयांना यासंबंधीच्या चौकशीचा आदेश दिला होता. मात्र अनेक अधिकारी या प्रकरणात अडकल्यामुळे व्यवस्थितपणे चौकशी केली जात नाही, अशी परिस्थिती आहे. दोन व्यवहारासंबंधीची कागदपत्रे महानगरपालिकेतून दिलेली नाहीत. कोठे तरी तयार करून व्हॉट्सऍपवर व्हायरल केली आहेत. मार्केटचे पोलीस निरीक्षक मल्लिकार्जुन तुळसीगेरी पुढील तपास करीत आहेत.









