वार्ताहर /किणये
मच्छे-वाघवडे रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडलेले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहतुकीस धोका निर्माण झाला आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यासंदर्भात महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. मच्छे-वाघवडे रस्त्यावर खड्डे पडल्याने रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली असून येथील वाहनधारकांना कसरत करावी लागत आहे. मच्छे-वाघवडे रस्त्यावर औद्योगिक वसाहत असल्याने विविध कारखान्यांत हजारो कामगार कार्यरत असून या रस्त्यावर बरीच वर्दळ असते. या सोबत कारखान्यांना कच्चा माल पुरवठा करण्यासाठी अवजड वाहने ये-जा करीत असतात. त्यामुळे हा रस्ता लवकर दुरुस्ती करण्यात यावा, अशी मागणी युवा समितीच्या वतीने केली आहे. या खड्डेमय रस्त्यामुळे नागरिक वैतागून गेलेले आहेत. या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास कामगार वर्ग व स्थानिक नागरिकांनी मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
दुरुस्ती न केल्यास आंदोलन – साईनाथ शिरोडकर, मच्छे
मच्छे-वाघवडे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे खड्ड्यांमुळे रोज एक ते दोन किरकोळ अपघाताच्या घटना घडत आहेत. याची गंभीर दखल प्रशासनाने घेतली पाहिजे. मात्र सरकारचे या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळेच आम्ही म. ए. समिती युवा समितीच्या माध्यमातून राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाकडे तक्रार दिलेली आहे. दै. ‘तरुण भारत’ वृत्तपत्रातूनही या रस्त्यासंदर्भात आवाज उठवण्यात आलेला आहे .प्रशासनाने या रस्त्याची दुरुस्ती न केल्यास आम्ही आंदोलन करणार आहोत.









