माजी मंत्री रेणुकाचार्य यांची माहिती
प्रतिनिधी/ बेंगळूर
आमदार बसवनगौडा पाटील-यत्नाळ आणि रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात लवकरच हायकमांडकडे तक्रार करणार असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्याची विनंती हायकमांडला करणार आहे, अशी माहिती माजी मंत्री रेणुकाचार्य यांनी दिली. रविवारी बेंगळूरमध्ये पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, यत्नाळ काँग्रेस पक्षाच्या एजंटप्रमाणे काम करत असून आपल्यामागे कोण आहेत ते उघड करावे, असे आव्हान दिले.
यत्नाळ यांची यापूर्वी पक्षातून हकालपट्टी करण्यात आली होती, तेव्हा त्यांनी येडियुराप्पा यांचे पाय धरून पक्षात पुन्हा प्रवेश केला होता. तुम्हाला येडियुराप्पांबद्दल बोलण्याची नैतिकता नाही. बी. एस. येडियुराप्पा यांनी सायकल, स्कूटर, बस आणि कारमधून स्वार होऊन पक्षाची बांधणी केली आहे. त्यामुळे यत्नाळ यांनी सावधपणे बोलावे. यापुढे येडियुराप्पांविरुद्ध बोलल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
विजयेंद्र यांना हायकमांडने प्रदेशाध्यक्ष बनविले आहे. विजयेंद्र यांच्यावर आरोप केल्यास ते हायकमांडवर केल्यासारखे आहे. तुम्ही काहीही केले तरी विजयेंद्र यांचा करिष्मा कधीच कमी होत नाही. तुम्हाला येडियुराप्पांबद्दल बोलण्याची नैतिकता नाही. यत्नाळ काँग्रेसच्या एजंटसारखे वागत आहेत. काहींना विजयेंद्रचा करिष्मा कमी करता येईल, असे वाटत आहे. आम्ही आजपर्यंत तुमच्याबद्दल मोठ्या आदराने बोललो, आता सहन होत नाही. येत्या शनिवारी हायकमांडला भेटून तक्रार करू, असे सांगितले.









