चार दिवसांत चाळीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : काहींचे अधिकारही गोठवले : कर्मचाऱ्यांची थेट महापालिका आयुक्तांच्या बदलीसाठीच मोहीम
बेळगाव : महानगरपालिकेत सुरू असलेल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमधील शीतयुद्धामुळे चार दिवसांत तब्बल 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी नुकतीच न्यू वंटमुरी येथे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन मनपा आयुक्त शुभा बी. यांच्यावर बदलीसह कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्यामुळे बेळगाव महानगरपालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. महापालिका आयुक्त म्हणून शुभा बी. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर महापालिकेत कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांवर आपला वचक निर्माण करण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत. त्यातच चार दिवसांत तब्बल 40 अधिकाऱ्यांच्या बदल्या त्यांनी केल्या असल्याने महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. बदलीच्या माध्यमातून आयुक्त आपला मानसिक छळ करत असल्याचे सांगत मनपा अधिकारी व कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांची भेट घेऊन गाऱ्हाणे मांडले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रशासकीय कारणास्तव करण्यात आल्याचे मनपा आयुक्त शुभा बी. यांचे म्हणणे आहे.
बदलीसत्रामुळे त्रस्त झालेल्या मनपा कर्मचाऱ्यांनी थेट महापालिका आयुक्तांच्या बदलीसाठीच मोहीम उघडली आहे. यासाठी विविध विभागातील प्रमुख व कर्मचाऱ्यांच्या सह्यादेखील घेतल्या जात असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगाव महानगरपालिकेवर केएमएस दर्जाच्या अधिकाऱ्याची आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. 6 लाख लोकसंख्या असलेल्या बेळगाव महानगरपालिकेवर केएमएस अधिकारी नियुक्त करण्याचा हा पहिलाच प्रकार आहे. त्यामुळे महापालिकेवर आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी मनपा कर्मचाऱ्यांनी पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांच्याकडे केली आहे. त्यामुळे महापालिकेतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. वेगवेगळ्या प्रकारे मनपाची बदनामी होत असतानाच कर्मचाऱ्यांनी चक्क मनपा आयुक्तांविरोधातच आघाडी उघडल्याने राज्यभरात हा चर्चेचा विषय बनला आहे.
अधिकार गोठवण्यात आल्याने अधिकारी अस्वस्थ
महापालिकेतील गैरकारभारावर अंकुश ठेवण्यासाठी महापालिका आयुक्त शुभा बी. यांनी विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे सत्र सुरूच ठेवले आहे. त्यातच काही विभाग प्रमुखांचे अधिकारदेखील गोठवले असून सर्वाधिकार आपल्याकडे घेतले आहेत. त्यामुळे कोणत्याही निर्णयाची अंमलबजावणी करायची असल्यास त्यावर मनपा आयुक्तांची सही असणे गरजेचे आहे. अचानक अधिकार गोठवण्यात आल्याने अधिकारी अस्वस्थ बनले आहेत.









