पुणे / प्रतिनिधी :
कसबा विधानसभा मतदारसंघ पोटनिवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी भाजपचे नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे तक्रार दाखल केली आहे. ‘हिंदुत्वासाठी मतदान करा. कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे,’ या जोडीलाच फडणवीस यांनी पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख केल्याचा आक्षेप यात घेण्यात आला आहे.
या तक्रारीत धंगेकर म्हणतात, दि. २३ फेब्रुवारी रोजी कसबा विधानसभा पोटनिवडणुकीतील प्रचारात केलेल्या भाषणात भाजपचे ज्येष्ठ नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘हिंदुत्वासाठी मतदान करा. कसबा मतदारसंघ हा हिंदुत्ववादी आहे,’ असे वक्तव्य केले होते. या जोडीलाच त्यांनी श्री पुण्येश्वर मंदिराचाही उल्लेख करत कॉंग्रेस पक्ष व राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष यांनी पुण्येश्वर महादेव मंदिराबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहनही केले होते. निवडणूक प्रचारात धर्माचा वापर करून समाजात दुही माजवण्याचा प्रयत्न फडणवीस यांनी केल्याचे व त्याद्वारे निवडणूक आचारसंहितेचा भंग केल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यावर निवडणूक आयोगाने त्वरित कार्यवाही करावी, अशी मागणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी मुख्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.








