उपनिबंधकपदी पुन्हा रवींद्र पाटील, सूत्रे सोपविण्यावरुन नाट्यामय घडामोडी
बेळगाव : गत आठवड्यात सहकार संघाच्या जिल्हा उपनिबंधक म्हणून रंजना पोळ यांनी पदभार स्वीकारला होता. मात्र या नियुक्तीविरोधात यापूर्वीचे जिल्हा उपनिबंधक रवींद्र पाटील यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन दाद मागितली होती. उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठाने रंजना पोळ यांच्या नियुक्तीला स्थगिती देत रवींद्र पाटील यांना उपनिबंधकपदी कायम ठेवले आहे. सदर स्थगिती आदेश घेऊन बुधवारी रवींद्र पाटील पदभार स्वीकारण्यासाठी कार्यालयात गेले. मात्र रंजना पोळ यांनी न्यायालयाची अस्सल प्रत देण्याची मागणी केली. यामुळे काही वेळ खुर्चीवरून नाट्यामय घडामोडी घडल्या. अखेर रवींद्र पाटीलनी पदभार स्वीकारून सरकारी वाहनातून ते निघून गेले.
सहकार संघाचे बेळगाव जिल्हा उपनिबंधक म्हणून यापूर्वी एम. एन. मनी कार्यरत होते. ते 31 ऑगस्ट 2024 रोजी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांच्या जागी रवींद्र पाटील यांची उपनिबंधक म्हणून वर्णी लागली. त्यामुळे ते गेल्या दहा महिन्यांपासून उपनिबंधक म्हणून कार्यरत होते. मात्र गत आठवड्यात अचानक त्यांच्या बदलीचा आदेश जारी करण्यात आला. त्यांच्या जागी नूतन उपनिबंधक म्हणून रंजना पोळ यांची नियुक्ती केली. त्यानुसार पोळ यांनी आपला पदभार स्वीकारला. मात्र याविरोधात रविंद्र पाटील यांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात धाव घेऊन बदली आदेशाला स्थगिती देण्यासाठी अर्ज केला होता. यावर सुनावणी होऊन न्यायालयाने पोळ यांच्या नियुक्तीला स्थगिती देत रवींद्र पाटील यांची नियुक्ती कायम ठेवली आहे.
सदर आदेशाची प्रत बुधवारी उपलब्ध झाल्यानंतर हँड डिलिव्हरी कॉपी घेऊन रवींद्र पाटील पदभार स्वीकारण्यासाठी सहकार खात्याच्या कार्यालयात गेले. त्याठिकाणी असलेल्या उपनिबंधक रंजना पोळ यांच्याकडे न्यायालयाच्या आदेशाची प्रत देऊन सूत्रे बहाल करण्याची विनंती केली. मात्र पोळ यांनी न्यायालयाची अस्सल आदेश प्रत देण्याची मागणी केली. त्यामुळे यावरून काही वेळ पेचप्रसंग निर्माण झाला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून रवींद्र पाटील यांनी पदभार स्वीकारला. त्यानंतर ते सहकार खात्याच्या सरकारी वाहनातून निघून गेले. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत रंजना पोळ या आपल्या खूर्चीवर कार्यालयात बसून होत्या. ही माहिती समजताच माध्यम प्रतिनिधींनी सहकार कार्यालयात गर्दी केली होती. बेळगाव जिल्ह्यात सहकार क्षेत्राचे जाळे मोठे आहे. त्यामुळे नेहमीच उपनिबंधक खुर्चीसाठी अधिकाऱ्ऱ्यांची चढाओढ पाहावयास मिळते.









