बाणस्तारी अपघात प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाचा संबंधितांना आदेश
पणजी : बाणस्तारी अपघात प्रकरणाचा सविस्तर अहवाल क्राईम ब्रँचने आगामी साठ दिवसांत मोटार वाहन अपघात दावा लवादाकडे सादर करण्याचे निर्देश उच्च न्यायालयाने दिले असून मेघना सावर्डेकर यांनी जमा केलेल्या रु. 2 कोटीची भरपाई या अपघातात मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना वितरीत करण्यास बजावले आहे. अपघातातील वाहनमालक असलेल्या मेघना सावर्डेकर यांना रु. 2 कोटी जमा करण्याचे आदेश यापूर्वी दिले होते. त्यानुसार मेघना यांनी तेवढी रक्कम न्यायालयात जमा केली आहे. सदर अपघातात दिवाडी येथील फडते कुटुंबातील दोघांचा मृत्यू झाला तर अरुण कर्माकर याचाही बळी गेला होता. त्या दोन्ही कुटुंबांना प्रत्येकी रु. 50 लाख देण्यात यावे, अशी सूचना न्यायालयाने केली आहे.
हळर्णकरना 40 लाख द्यावे
अपघातातील जखमी झालेल्या शंकर हळर्णकर यांना रु. 40 लाख देण्यात यावे, असे न्यायालयाने म्हटले आहे. जखमी झाल्याने त्यांना अर्धांगवायु झाला असून ते अंथरुणाला खिळले आहेत.
वनिता भंडारीला 35 लाख द्यावे
अपघातात वनिता भंडारी ही महिला जबर जखमी झाली असून तिला रु. 35 लाख देण्यास बजावले आहे. भंडारी जखमी होऊन अंथरुणाला खिळल्या आहेत. काही महिन्यांनंतर त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार असून त्या उभ्या राहणार की नाही हे कळायला सध्या तरी कोणताही मार्ग नाही.
माजगावकरला 25 लाख द्यावे
अपघातात आणखी एकजण जखमी झाला असून त्याचे नाव राज माजगावकर असे आहे. त्याला रु. 25 लाख देण्याची सूचना न्यायालयाने केली आहे. या अपघातप्रकरणी म्हार्दोळ पोलिसांच्या समन्सला आव्हान देणारी याचिका मेघना सावर्डेकर यांनी उच्च न्यायालयात सादर केली होती. त्यावरील सुनावणीच्या वेळी हे आदेश न्यायालयाने दिले आहेत. आव्हान याचिकेवर मात्र कोणताही निकाल झाला नसल्याचे सांगण्यात आले.









