कोल्हापूर :
मान्सूनपूर्व पावसामुळे भात, भुईमूग, मका, ऊस, भाजीपाला, उडीद आदी पिके बाधित झाली असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शासन निर्देशानुसार कृषि विभागाकडून या पिकांचे पंचनामे केले जाणार आहेत. त्यानुसार येत्या आठ दिवसांत ग्रामसेवक, तलाठी आणि कृषी सहाय्यक यांच्यामार्फत बाधित पिकांचे पंचनामे केले जाणार आहेत. यामध्ये ज्या पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे, ते शेतकरीच नुकसान भरपाईसाठी पात्र ठरणार आहेत.
अवकाळी पाऊस, वादळी वारे, गारपीट व मान्सूनपूर्व पावसामुळे 95.30 हेक्टर क्षेत्रातील पिकांना फटका बसला आहे. यामध्ये 31 गावांतील 335 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचा कृषि विभागाचा प्राथमिक अंदाज आहे. केळी, आंबा, भात, भुईमूग, भाजीपाला, उडिद आदी पिक बाधित झाले आहे. कृषि विभागाचा हा प्राथमिक नजर अंदाज अहवाल आहे. पण या अंदाजापेक्षा अधिक प्रमाणात नुकसान झाल्याची शक्यता आहे. त्यामुळे या नुकसानीचे जलदगतीने पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल तत्काळ पाठविण्याच्या सूचना शासनाने कृषी विभागास दिल्या आहेत. यासाठी गावपातळीवर तलाठी, ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांच्या समितीकडून संयुक्तपणे पंचनामे सुरु केले जाणार आहेत. येत्या आठवड्याभरात पिकांचे पंचनामे पूर्ण होण्याची शक्यता असून त्याचा अहवाल जिल्हा प्रशासनामार्फत शासनाकडे पाठविला जाणार आहे.
कृषी विभाग व महसूल विभागाकडून केले जाणारे पंचनामे वस्तुनिष्ठपणे करावेत अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांकडून केली जात आहे. मागील काही वर्षात अतिपावसामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे प्रत्यक्ष पाहणी न करता एकाच जागेवर बसून केले होते. त्यामुळे परिणामी नुकसान झालेले शेतकरी नुकसान 33 टक्केहून अधिक नुकसान झाल्यास भरपाई दिली जाणार आहे.
यंदा अगदी 10 मे पासूनच पावसाची सुरुवात झाल्यामुळे शेकडो हेक्टर ऊस पिकाची भरणी खोळंबली आहे. तसेच खरीप हंगामातील पेरणीसाठी पूर्वमशागत झालेली नाही. सध्या शेतपिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. त्याला वाफसा येण्यासाठी सुमारे 15 दिवसांहून अधिक काळ पावसाची उघडीप आवश्यक आहे.
- पंचनामे लवकरच होणार सुरु
जिह्यात 1 ते 26 मे दरम्यान जोरदार पूर्वमोसमी पाऊस झाला. राधानगरी, हातकणंगले, शिरोळ, पन्हाळा आदी तालुक्यांमध्ये झालेल्या वादळी पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषत: हातकणंगले, शिरोळमधील भाजीपाला पिकांना फटका बसला आहे. याची दखल घेऊन कृषी विभाग महसूल विभागाच्या सहाय्याने येत्या आठ दिवसांत पंचनामे सुरु करणार आहे. पंचनामे पुर्ण झाल्यानंतर तत्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.
- 33 टक्क्यांहून अधिक नुकसान झालेल्या पिकांचे होणार पंचनामे
पूर्वमोसमी पावसामुळे जिह्यातील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक नजर अंदाज आहे. तलाठी, ग्रामसेवक व कृषी सहाय्यकांच्या सहाय्याने जिह्यातील बाधित पिकांचे पंचनामे सुरु केले असून आठवड्याभरात पूर्ण होतील. पण शासन निर्णयानुसार ज्या शेतकऱ्यांचे 33 टक्केहून अधिक नुकसान झाले आहे, त्यांनाच भरपाई दिली जाणार आहे.
– जालिंदर पांगरे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी








