शेतकरी संघटनेचे ठिय्या आंदोलन, प्रादेशिक आयुक्तांना निवेदन
बेळगाव : बेकिनकेरे ग्राम पंचायत व्याप्तीत येणाऱ्या अतिवाड येथे तलाव निर्माण करण्यासाठी लघुपाटबंधारे खात्याकडून अतिवाडातील शेतकऱ्यांची 15 वर्षांपूर्वी पिकाऊ जमीन संपादीत केली आहे. मात्र जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही. सदर भरपाई देण्यात यावी, या मागणीसाठी रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन करण्यात आले. अतिवाड येथे लघुपाटबंधारे खात्याकडून 60 एकर जमीन संपादन करून त्यामध्ये तलाव निर्माण केला आहे. यामध्ये जवळपास 40 पेक्षा अधिक शेतकऱ्यांना आपल्या पिकाऊ जमीनी गमवाव्या लागल्या आहेत. 2007 मध्ये या जमिनी संपादन करून तलाव निर्माण केला आहे. या घटनेला आता 15 वर्षांचा कालावधी लोटला असला तरी जमीन गमावलेल्या शेतकऱ्यांना भरपाई दिली नाही. शेतकऱ्यांकडून अनेकवेळा मागणी केली असली तरी याकडे दुर्लक्ष केले आहे. या भागाचे तत्कालीन आमदार व विद्यमान आमदारांकडूनही शेतकऱ्यांना प्रतिसाद दिला नाही. यामुळे शेतकऱ्यांतून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
रस्त्यावर नारळ वाढवून प्रशासनाचा निषेध
भरपाईसाठी पाठपुरावा करूनही दखल घेतली नसल्याने शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रस्ता बंद करून ठिय्या आंदोलन केले. रस्त्यावर नारळ वाढवून प्रशासनाचा निषेध केला. आंदोलन केल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. जिल्हाधिकारी जनता दर्शनासाठी बैलहोंगलला गेल्याने प्रांताधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शेतकरी नेते किसन नंदी, आनंद पाटील, यल्लाप्पा पाटील, गंगाराम सावंत, निलेश केसरकर, सातेरी केसरकर, बाळकृष्ण पाटील, परशराम बोकमूरकर, सातेरी केसरकर, जयवंत पाटील, शिवाजी पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.









