बेळगाव : खरीप हंगामातील पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. पेरणी केलेल्या पिकांचेही नुकसान झाले आहे. पिके पावसाअभावी वाळून जात आहेत. यामुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक भरपाई देण्यात यावी, अशी मागणीचे राज्य रयत संघातर्फे जिल्हा पंचायत कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. रायबाग तालुक्यात अपेक्षित प्रमाणात पाऊस न झाल्याने उगवलेली पिके करपू लागली आहेत. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. खर्च करून केलेली पिकांची पेरणी, रासायनिक खताचा खर्च शेतकऱ्यांना नुकसानकारक आहे. याची दखल घेऊन आर्थिक नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
चाऱ्याचा प्रश्नही गंभीर
जनावरांच्या चाऱ्याची भविष्यातील कमतरता लक्षात घेत प्रशासनाने चाऱ्याची व्यवस्था करावी. गो-शाळा सुरू करून जनावरांसाठी चारा उपलब्ध करून द्यावा, रोजगार हमी योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या शेतांमध्ये कामे राबवून रोजगार उपलब्ध करून द्यावा, अशी मागणा करण्यात आली.









