आपत्कालीन निधीवरून विरोधी गटाच्या नगरसेवकांचा गदारोळ : महापौरांना पकडले कोंडीत
बेळगाव : महापौर व उपमहापौर यांच्यासाठी आपत्कालीन निधी राखीव ठेवला जातो. हा निधी केवळ आणीबाणीवेळीच खर्च करायचा असतो. महत्त्वाच्या समस्या दूर करण्यासाठी अत्यावश्यकवेळी या निधीचा वापर झाला पाहिजे. मात्र महापौर शोभा सोमणाचे आणि उपमहापौर रेश्मा पाटील यांनी समुदाय भवन आणि नावाची कमान उभे करण्याबाबत निधीचा वापर करण्यासाठी प्रस्ताव दिला आहे. यामुळे महापालिकेच्या सभागृहात विरोधी गटाच्या नगरसेवकांनी एकच गोंधळ सुरू केला. महापौरांना धारेवर धरले. त्यामुळे तब्बल दीड तासाहून अधिकवेळ बैठकीचे कामकाज रेंगाळले होते. महापौर आणि उपमहापौरांसाठी आपत्कालीन निधीची तरतूद केली जाते. तो निधी अत्यंत अत्यावश्यक असलेल्या कामासाठी वापरणे महत्त्वाचे आहे. मात्र हा निधी वापरताना सर्व नियम धाब्यावर बसविण्यात आल्याचा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक मुज्जम्मील डोणी यांनी केला. यामुळे सत्ताधारी गटातील नगरसेवकांनी तो निधी वापरण्याचा अधिकार महापौर, उपमहापौरांना आहे. त्यामुळे आम्ही त्या ठरावाला मंजुरी देत असल्याचे सांगितले.
आपत्कालीन निधी जवळपास 10 महिने तसाच महापालिकेकडे पडून आहे. त्यामुळे तो निधी वापरला जात आहे. यापूर्वी अत्यावश्यक समस्येसाठी निधी हवा असेल तर तुम्ही आम्हाला पत्र का दिला नाही? असा प्रश्न विचारला. त्यावर नगरसेविका रेश्मा बैरक्कण्णावर यांनी आमच्या प्रभागामध्ये येऊन तुम्ही पाहणी केला, किती समस्या आहेत, महत्त्वाचे म्हणजे दुचाकीवरून जाताना एक महिला पडून तिचा गर्भपात झाला होता. इतकी गंभीर बाब तुमच्या लक्षात असताना तेथील कामासाठी तुम्ही तो निधी दिला नाही. असे सांगत सत्ताधारी गटाला आणि महापौरांना चांगलेच कोंडीत पकडले. या नगरसेविकेच्या प्रश्नामुळे सत्ताधारी गटाच्या नगरसेवकांना उत्तर देणे अवघड झाले. महापौर शोभा सोमणाचे यांनी आम्ही निधी सर्व प्रभागांना देण्याचा प्रयत्न केला आहे. एकाच प्रभागाला मी तो निधी दिला नाही, असे सांगितले. मात्र विरोधी गटाच्या नगरसेवकांनी महापौरांनी समुदाय भवन व कमान महत्त्वाची की महिलेचा गर्भपात झालेली घटना? याचे उत्तर सभागृहात द्यावे, अशी जोरदार मागणी केली. विरोधी गटातील नगरसेवकांच्या या भूमिकेमुळे महापौर चांगल्याच गोंधळल्या होत्या. त्यांनी थेट अभियंत्या लक्ष्मी निपाणीकर उत्तर देतील, असे सांगितले. त्यावर विरोधी गटाच्या नगरसेवकांनी अधिकाऱ्यांनी उत्तरे द्यायची नसतात, तर महापौरांनी त्याचे उत्तर दिले पाहिजे, असे सांगितले. त्यामुळे सत्ताधारी गटाचे गटनेते राजशेखर डोणी यांच्यासह इतर नगरसेवकांनीही जोरदार आवाज उठविला. विरोधी गटाच्या या प्रश्नामुळे दीड तासाहून अधिकवेळ वाया गेला.
सभागृहाचा पुन्हा अवमान
सभागृह कसे चालवावे, तसेच सभागृहामध्ये कोणते प्रश्न विचारणे, याचबरोबर विचारल्यानंतर त्याचे उत्तर कोणी द्यायचे, हेच या सभागृहातील नगरसेवकांना माहीत नसल्याचे दिसून आले. विरोधी गटाचे नगरसेवक अचानकपणे जागेवरून उठून महापौरांच्या आसनासमोर आले. त्यावेळी सत्ताधारी गटाने त्याला जोरदार विरोध केला. कायदा सल्लागारांनी तुमच्या जागेवर उभे राहून तुम्ही तुमचे मत मांडा, असे सांगितले. तर सत्ताधारी गटातील नगरसेवक अचानकपणे उठून महापौरांनी द्यावयाचे उत्तर आपणच देत होते. त्यामुळे सर्वसाधारण सभेमध्ये अनेकवेळा सभागृहाचा अवमान झाल्याचे दिसून आले.









