‘सेव्ह कोमुनिदाद सेव्ह गोवा’ अभियान सुरू
पणजी : कोमुनिदाद जमिनीवर उभारण्यात आलेल्या बेकायदा बांधकामांना नियमित करण्याच्या सरकारी प्रस्तावाला कोमुनिदादच्या व्यवस्थापन समित्यांनी विरोध दर्शवला असून ‘सेव्ह कोमुनिदाद, सेव्ह गोवा’ या नावाने अभियान सुरू केले आहे. सदर प्रस्तावाचा निषेध करणारा ठरावही सर्व कोमुनिदाद समित्या घेणार असल्याचे सांगण्यात आले. या प्रकरणी आवाज उठवण्यासाठी येत्या 19 जुलै रोजी पणजी चर्च चौकात बैठक घेऊन पुढील कृती ठरवण्यात येणार आहे. बेकायदेशीर बांधकामे नियमित करण्यासाठी येत्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणण्याचा सरकारचा बेत असून त्यास आक्षेप घेण्यासाठी महसूल खात्याच्या सचिवांना निवेदन देण्यात येणार आहे.
सरकारचा हा निर्णय चुकीचा असल्याचे कोमुनिदाद संस्थांचे म्हणणे आहे. कोमुनिदादच्या जमिनीसाठी वेगळे नियम (कोड) असून त्या पुढील पिढीसाठी राखून ठेवण्याची जबाबदारी आहे. त्या शिवाय गावकर, भागधारक यांचाही विचार केला जातो. कोमुनिदाद जमिनीवरील बेकायदा बांधकामे म्हणजे जमिनी बळकावून केलेली बांधकामे आहेत. त्यांना मान्यता देणे म्हणजे जमिनी हडप करण्याच्या कृतीस मान्यता देण्यासारखे आहे. ती बांधकामे नियमित केल्यास पुन्हा तशीच बेकायदा बांधकामे वाढीस लागतील, असेही निवेदनात म्हटले आहे. पावसाळी अधिवेशनापूर्वी आवाज उठवण्यासाठी 19 जुलै रोजी पणजीत बैठक आणि त्यानंतर सरकारला निवेदन देण्याचे ठरविले आहे. पणजीतील बैठकीस सर्वांनी उपस्थित राहावे आणि अधिक माहितीसाठी 9823514088 या नंबरवर फोन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.








