गोवा तसेच कर्नाटकाच्या विविध भागांतील धार्मिक कार्यक्रमांत सहभागी होणार
काणकोण : पर्तगाळी जिवोत्तमतीर्थ मठाधीश श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज आज 5 पासून गोवा तसेच कर्नाटकातील विविध भागांत संचारावर रवाना होत असून 9 जुलै रोजी पनवेल येथील शांतिकुंज सेवाश्रमात ते चतुर्मास व्रताचरणाला प्रारंभ करणार आहेत. आज 5 ते 8 एप्रिलपर्यंत श्री नागेश महारूद्र संस्थान, बांदिवडे येथील वार्षिक उत्सवाला स्वामी महाराज उपस्थित राहणार आहेत. 12 रोजी पर्तगाळी मठात श्रीमद् इंदिराकांततीर्थ स्वामी महाराजांची 81 वी पुण्यतिथी पाळली जाणार आहे. त्यानंतर 14 ते 18 पर्यंत श्री लक्ष्मी वेंकटेंश मंदिर, सिद्धापूर येथील धार्मिक उत्सवात स्वामी महाराज सहभागी झाल्यानंतर 18 ते 23 पर्यंत श्री महाविष्णू मंदिर, शिर्सी येथील वरदांती उत्सव स्वामीजींच्या उपस्थितीत साजरा होणार आहे. 2 ते 4 मेपर्यंत हुबळी येथील श्री सरस्वती सदन, 4 ते 9 मेपर्यंत श्री लक्ष्मी वेंकटेश मंदिर, होन्नावर, 14 ते 21 मेपर्यंत गोकर्ण मठ, 21 ते 24 मेपर्यंत श्री सनातन गोपालकृष्ण देवस्थान, अन्नामेबल मोदीपू, तर 24 मे रोजी श्री वेंकटरमण स्वामी देवस्थान, बंटवाल येथील सहस्त्रकलशाभिषेक कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर 28 मे रोजी श्रीमद् विद्याधीशतीर्थ स्वामी महाराज पर्तगाळी मठात परत येणार आहेत.
पनवेलमध्ये चतुर्मास व्रताचा स्वीकार
त्यानंतर 7 जून रोजी येल्लापूर येथील एका धार्मिक कार्याला उपस्थित राहून स्वामी महाराज लगेच पर्तगाळी मठात परत येणार आहेत. 28 जून रोजी पर्तगाळी मठात 23 वे गुरुस्वामी श्रीमद् विद्याधिराजतीर्थ स्वामी महाराजांच्या दुसऱ्या पुण्यतिथीनिमित्त समारंभ होणार आहे. 1 ते 7 जुलेपर्यंत बेळगावच्या विद्याधिराज सभागृहातील कार्यक्रमांनंतर 7 जुलै रोजी पनवेलच्या शांतिकुंज सेवाश्रमाला ते भेट देतील आणि दर्शन घेतील. 8 जुलै रोजी वडाळा मठाला भेट दिल्यानंतर 9 जुलैपासून पनवेल येथील शांतिकुंज सेवाश्रमात स्वामी महाराज चतुर्मास व्रताचा स्वीकार करतील.









