दौलत हवालदार यांचे प्रतिपादन, श्रद्धानंद विद्यालयाचा 90 वा वर्धापनदिन उत्साहात
काणकोण : आधुनिक तंत्रज्ञानामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांमधील संवाद हरवला आहे. विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती तसेच वेगळा विचार करण्याची शक्तीच कमी झाली आहे. आजचा विद्यार्थी भावनाशून्य असा बनत चालला आहे. अमली पदार्थांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढला आहे. फसव्या गोष्टींमुळे तरुणांच्या मनात गोंधळ निर्माण होत आहे. आपल्या संस्कृतीची श्रीमंती कायम ठेवायची असेल, तर आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर कमीत कमी करणे आवश्यक असल्याचे मत वित्त आयोगाचे अध्यक्ष दौलत हवालदार यांनी पैंगीणच्या श्रद्धानंद विद्यालयाच्या 90 व्या वर्धापनदिन समारंभात बोलताना व्यक्त केले. या समारंभाला विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सांगेचे उपजिल्हाधिकारी मिलिंद्र वेळीप सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष सुनील पैंगणकर, पालक-शिक्षक संघाचे अध्यक्ष व्यंकटराय नाईक व मुख्याध्यापिका सीमा प्रभुगावकर उपस्थित होत्या. यावेळी विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन खास गौरविण्यात आले.
त्यात मार्च, 2023 च्या दहावीच्या परीक्षेत विद्यालयात प्रथम आलेली नितिशा नरेश रेडकर, यश वासुदेव पै, सम्राट पुरस्कारप्राप्त रिद्धी आशुतोष कामत, सर्वोत्कृष्ट विद्यार्थी प्रणव खुशाली वेळीप, मारिया आफोंसो, कार्यानुभव विषयात उत्कृष्ट कामगिरी बजावलेला प्रतीक गुरुप्रसाद प्रभुगावकर, संगीतात नैपुण्याबद्दल मैत्रियी चिन्मय आमशेकर, उत्कृष्ट खेळाडू व कला क्षेत्रातील नैपुण्याबद्दल श्रीयश राजेश पागी, श्रद्धा उदय च्यारी, विद्यालयातील उत्कृष्ट छात्र श्लोका गौरीश भंडारी, संगणक विषयातील नैपुण्याबद्दल प्राची संदेश मेत्री, काणकोण तालुक्यात दहावीच्या परीक्षेत शिक्षकांच्या मुलांमध्ये प्रथम आलेली आश्ना महादेव देसाई, दहावीतील चांगले वर्तन असलेला विद्यार्थी हर्ष अरुण पैंगीणकर, उत्कृष्ट कलाकार सार्थक राजेंद्र च्यारी, भारतमाता पुरस्कारप्राप्त संयुक्ता राम पागी, दहावीतील आदर्श व होतकरू विद्यार्थी श्रद्धा उदय च्यारी, गुणवंत विद्यार्थी नीतेश परशुराम गावकर, साध्वी वासुदेव कामत, सरस्वती गोपाळ सिद्धी आणि अन्य विद्यार्थ्यांना याप्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या स्वागत गीतानंतर मुख्याध्यापिका प्रभुगावकर यांनी स्वागत, तर सुनील पैंगणकर यांनी प्रास्ताविक केले. सूत्रसंचालन संकेत वारीक, स्वाती कामत, कॅरल फर्नांडिस, हर्षदा सुकडकर यांनी केले. प्रेमानंद पागी यांनी आभार मानले.









