प्रतिनिधी,कोल्हापूर
सध्याच्या काळात कोणत्याही निवडणुका सोप्या राहिलेल्या नाहीत.त्यामुळे बूथ यंत्रणा सक्षम केली पाहिजे.बूथ यंत्रणा हा निवडणुकीचा आत्मा असून,मंडल प्रमुख आणि बूथ प्रमुखांनी त्यांची जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडावी. बूथ सक्षम करायचा असेल, तर एकेक घर आपलेसे करावे लागेल.त्यासाठी आपल्या हृदयातील कार्यकर्ता जागृत ठेवा. तसेच केंद्र व राज्य सरकारचे जनकल्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहचवा असे आवाहन राज्याचे कामगारमंत्री सुरेश खाडे यांनी केले.अगामी लोकसभा,विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप जिल्हा कार्यकारिणीची बैठक रविवारी राजर्षी शाहू स्मारक भवनमध्ये झाली.याप्रसंगी मार्गदर्शन करताना मंत्री खाडे बोलत होते.यावेळी खासदार धनंजय महाडिक प्रमुख उपस्थित होते.
कामगार मंत्री खाडे म्हणाले,बूथ यंत्रणा सक्षम झाली, तर निवडणूक जिंकता येते. 2019 च्या निवडणुकीत आपण केवळ बूथ यंत्रणेमुळे 37 हजार मतांनी निवडून आलो. निवडणुका जिंकण्याचा मार्ग दाखवणारी बूथ यंत्रणा हा निवडणुकीचा खरा आत्मा आहे. आपल्या हृदयातला कार्यकर्ता बूथ प्रमुखांनी नेहमीच जिवंत ठेवला पाहिजे. शासन योजनेचे लाभार्थी असणाऱ्या प्रत्येक घरात जाऊन बूथ प्रमुखांनी माहिती दिली पाहिजे. शक्ती प्रमुखांनी जे कार्यक्रम दिलेत, ते तंतोतंत पाळायचा प्रयत्न करा, अशी सूचना मंत्री यांनी केली. तसेच कोल्हापुरात भाजपचा एकही आमदार नाही, ही खंत आहे. ती खंत या निवडणुकांमध्ये भरुन काढाण्यासाठी प्रयत्न करा, असे आवाहन मंत्री खाडे यांनी केले.
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, मोदी सरकारला नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत.त्यानिमित्त मोदी ऍट द रेट-9 या कार्यक्रमाची रचना केली आहे.कार्यकर्त्यांनी लोकांच्या घराघरात जाऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 9 वर्षात काय केले हे सांगितले पाहिजे. त्यासाठी मंडल प्रमुखांनी बैठका घ्यायच्या आहेत,अशा सूचना खासदार धनंजय महाडिक यांनी कार्यकर्त्यांना दिल्या.तसेच केंद्र व राज्य सरकारने ज्या लोकोपयोगी योजना राबवल्या, त्याची माहिती लोकांपर्यंत पोहचवण्याची जबाबदारी मंडल आणि बूथ प्रमुखांनी घ्यावी.प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक हजार लोकांना जाऊन भेटले पाहिजे.कार्यकर्त्यांनी केलेल्या कार्याची नोंद ठेवली जाणार आहे, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
बूथ सक्षमीकरण अभियान कार्यक्रम पक्षाकडून आला आहे. त्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी बूथ प्रमुखांची आहे. पुढच्या काळात प्रत्येकाला जबाबदारी दिली जाईल. कोल्हापूर जिल्ह्यातून किमान 6 आमदार भाजपचे निवडून येतील,यादृष्टीने कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केले.जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांनी प्रास्ताविक केले. बैठकीला माजी आमदार अमल महाडिक,महिला जिल्हाध्यक्षा शौमिका महाडिक,राष्ट्रीय सचिव महेश जाधव,विजय जाधव, डॉ. संजय पाटील, अशोक देसाई, ग्रामीण सरचिटणीस सुनील मगदूम आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous ArticleAjit Pawar : ‘राष्ट्रवादी’ची ताकद साडेतीन तालुक्यातच
Next Article बोगस मतदान रोखण्यासाठी आता शाईऐवजी लेझर मार्क









