कोल्हापूर :
सिध्दार्थनगर कमानीजवळ राजेबागस्वार फुटबॉल क्लबच्या वर्धापन दिनानिमित्त रस्तात घातलेलं स्टेज काढण्यावरुन शुक्रवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास तणावनिर्माण झाला. यातूनच दोन गटात तुफान दगडफेक झाली. यामध्ये चार पोलीसांसह दहा जण जखमी झाले. प्रक्षुब्ध जमावाने एक टेम्पोसह कार पेटवली. अनेक वाहनांची मोडतोड केली. दरम्यान, पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणाखाली आणली असली तरी रात्री उशीरापर्यंत दोन्ही गट आमने-सामने उभे टाकल्याने वातावरण तणावपूर्ण होते.
याबाबत घटनास्थळावरुन समजलेली माहिती अशी, सिध्दार्थनगर कमानीसमोरील भारत तरुण मंडळ प्रणित राजेबागरवार फुटबॉल क्लबचा वर्धापन दिन होता. या कार्यक्रमासाठी तरुणांनी सिध्दार्थनगर कमानीजवळ मोठे स्टेज उभारले होते. स्टेजमुळे येण्या-जाण्यास अडथळा होत होता. त्यामुळे स्टेजची अडचण नको, अशी भूमिका काहींनी घेतली. दरम्यान, तक्रारीनंतर पोलिसांनी रस्त्यातील स्टेज हटवले. सायंकाळी तरुणांनी ढोल-ताशाच्या गजरात जल्लोष केला. सिध्दार्थनगरातही काही तरुण जल्लोष करत गेले.
यातून काहीजणांमध्ये हमरीतुमरी झाली. यानंतर दोन्ही गट आमने-सामने आले. यातच काहींनी कमानीवर असणारा झेंडा काढला. झेंडा काढल्याची बातमी परिसरात वाऱ्यासारखी पसरली. सिध्दार्थनगरातून सुमारे हजाराहून महिला आणि पुरुषांचा जमाव कमानीजवळ आला. तर राजेबागस्वार क्लब समर्थकही मोठ्या संख्येने जमले होते. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर तुफान दगडफेक करण्यास सुरूवात केली. रस्त्यातील विजेच्या खांबांवरील दिवेही दगड मारुन फोडल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. सुमारे अर्धा तास जमाव एकमेकांवर दगडफेक करत होता. यामुळे परिसरातील वातावरण कमालीचे तणावपूर्ण बनले.

दगडफेकीची बातमी कळताच पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरजकुमार बच्चू फौजफाट्याराह घटनास्थळी दाखल झाले.
दरम्यान, कमानीजवळ लावलेला एक टेम्पो जमावाने उलटा करुन पेटवून दिला. एका कारचेही मोठे नुकसान केले. तर अनेक रिक्षा, वाहनांवरही दगडफेक नरुन नुकसान केले. अनेक वाहनांच्या काचा फोडल्या. पोलिसांवरही जमावाने दगडफेक केली. यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यासह चार पोलीस कर्मचारी जखमी झाले. तर दोन्ही बाजूंचे सुमारे १० ते १५ जण दगडफेकीत जखमी झाल्याचे समजते. जखमींना उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले आहे.
मोठा पोलीस फौजफाटा आल्यानंतरही दोन्ही बाजूंनी वातावरण गंभीर बनले होते. दरम्यान, घटनास्थळी दाखल झालेल्या दंगल विरोधी पथकाने बेरेकेटस् लावून दोन्ही बाजूंच्या तरुणांना रोखून धरले होते. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र सुमारे तासभर जमाव ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हता. पोलीस उपअधीक्षक तानाजी सावंत आणि पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांनी काही तरुणांना शेजारील हॉलमध्ये नेले. तिथे त्यांची समजूत काढली. तर रस्त्यावर थांबलेल्या जमावालाही कडक कारवाईचा इशारा पििलसांनी दिला. जमाव शांत नाही झाला तर बळाचा वापर करण्याचा निर्धार पोलिसांनी केला. पोलिसांनी कडक भूमिका घेतल्याने सुदैवाने बाका प्रसंग आला नाही. पोलिसांनी मध्यरथी करत कमानीजवळ लावलेले तीन फलक काढले. कमानीजवळील झेंडाही सन्मानाने परत बसवला. ज्यांनी फलक लावला होता त्यांनाच तो काढण्यास भाग पाडले. यानंतर काहीसा तणाव निवळला. मोठा बाका प्रसंग टळल्याने यंत्रणेनेही सुस्कारा सोडला. तरीही परिसरात रात्रभर पोलिसांनी खडा पहारा ठेवला होता.

- दगडांचा खच
सिध्दार्थनगर कमानीजवळ दोन्ही बाजूंनी सुमारे अर्धा तास तुफान दगडफेक सुरू होती. मुख्य रस्त्यावरच दगडांचा वर्षाव सुरू झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण झाले. दोन्ही बाजूंनी हातात मिळेल तो दगड आणि साहित्य एकमेकांच्या दिशेने भिरकावले जात होते. दोन तासांनी तणाव निवळल्यानंतर परिसरात अक्षरशः दगडांचा आणि चपलांचा खच पडला होता.
- तासभर टेम्पो पेटत होता
प्रक्षुब्ध जमावाने कमानीजवळ लावलेला एक टेम्पो रस्त्यात उलटा केला. यानंतर काहींनी डिझेल टाकून तो पेटवून दिला. यंत्रणेने आग विझवण्याचा प्रयत्न केला. पेटत्या टेम्पोची धग तासभर सुरू होती. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्याने पुढील अनर्थ टळला.
रात्री उशिरापर्यंत परिसरात तणावाचे वातावरण होते. त्यामुळे मोठा पोलीस फौजफाटा, दंगल विरोधी पथक घटनास्थळी रात्रभर तळ ठोकून होते. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता रात्रभर परिस्थितीचा आढावा घेत होते. उत्सवाच्या पार्श्वभूमीवर अनर्थ घडू नये, यासाठी पोलीस प्रशासनाने कमालीची दक्षता घेतली होती.
- एसपी गुप्ता यांनी परिस्थिती आणली नियंत्रणात
पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बॅरेकेटस् लावून परिसरात नाकाबंदी केली. दोन्ही बाजूचे जमाव आमने-सामने येणार नाहीत याची खबरदारी घेतल्यानेच पुढील अनर्थ टळला. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांनी जलदगतीने हालचाल करत परिस्थिती नियंत्रणाखाली आणली. पोलिसांनी पहिल्या टप्प्यात संयमाची भूमिका घेत दोन्ही बाजूंची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. जमावाने पहिल्यांदा आडमुठी भूमिका घेण्याचा प्रयत्न करताच पोलीस ताकदीने कारवाई करतील, असा दमही दिला. पोलिसांनी संयमाने परिस्थिती हाताळल्याने गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहर अशांत होण्यापासून वाचले.








