बर्मिंगहम स्पर्धेत वेटलिफ्टिंगमध्ये 55 किलोग्रॅम वजनगटात रुपेरी पदकाची कमाई
बर्मिंगहम / वृत्तसंस्था
चार वर्षांपूर्वी स्वतःच निश्चित केलेल्या महत्त्वाकांक्षेला थोडीफार गवसणी घालताना सांगलीचा युवा वेटलिफ्टर संकेत सरगर याने शनिवारी बर्मिंगहममध्ये वेटलिफ्टिंगमध्ये झळाळत्या रौप्यपदकावर आपली मोहोर उमटवली. संकेतने पुरुष गटातील 55 किलोग्रॅम वजनगटात हे रुपेरी यश संपादन केले.
वास्तविक, संकेतचे येथे सुवर्णपदकाचे लक्ष्य होते. मात्र, क्लीन अँड जर्कमध्ये 139 किलोग्रॅम वजन उचलत असताना त्याच्या उजव्या ढोपराला वेदना जाणवल्या आणि ते प्रयत्न सोडून द्यावे लागले. 21 वर्षीय संकेतने एकूण 248 किलोग्रॅम (113 व 135) वजन उचलले. या गटात मलेशियाच्या मोहम्मद अनिकने 249 किलोग्रॅम (107 व 242 किलोग्रॅम) वजन उचलत सुवर्ण तर श्रीलंकेच्या दिलांका इसुरु कुमाराने 225 किलोग्रॅम (105 व 120 किलोग्रॅम) वजन उचलत कांस्यपदक मिळवले.

आपल्या वडिलांसमवेत सांगलीत छोटे पान शॉप सांभाळणाऱया संकेतसाठी अर्थातच आजवरच्या क्रीडा कारकिर्दीतील हे सर्वात मोठे यश ठरले. आयुष्यातील वाटचालीत समोर येऊन ठाकलेल्या आव्हानांना सामोरे जाताना संकेतची तळमळ, बांधिलकी आणि समर्पण विशेष महत्त्वाचे ठरले आणि याच बळावर तो राष्ट्रकुल रौप्य जिंकण्याची मजल मारुन गेला.
राष्ट्रकुलमध्ये रौप्य जिंकण्यापूर्वी तीनवेळा नॅशनल चॅम्पियन ठरलेल्या संकेतने स्नॅचमधील आपल्या दुसऱया लिफ्टमध्ये मोठी आघाडी घेतली आणि तिसऱया लिफ्टमध्ये 113 किलोग्रॅम वजन उचलण्याचा वैयक्तिक सर्वोत्तम विक्रमाशी बरोबरी केली. ब्रेकनंतर त्याच्याकडे 6 किलोग्रॅम वजन फरकाने आघाडीही प्राप्त होती. मात्र, पुढे क्लीन अँड जर्कमध्ये तो 139 किलोग्रॅम वजन उचलण्यात अपयशी ठरला आणि त्याचे सुवर्णपदकाचे इरादे सफल होणार नाहीत, याचे पहिले संकेत मिळाले. तिसऱया प्रयत्नात त्याच्याकडून आणखी निराशा झाली आणि ही बाब मलेशियाच्या मोहम्मदच्या पथ्यावर पडली. तो सुवर्णपदकाचा मानकरी ठरला.
मागील राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या वेटलिफ्टर्सनी 5 सुवर्णपदकासह 9 पदके जिंकली होती. यंदाही त्यांच्याकडून दर्जेदार कामगिरीची अपेक्षा आहे. शनिवारी उशिरापर्यंत चालणाऱया इव्हेंट्समध्ये ऑलिम्पिक रौप्यजेती मिराबाई चानू (49 किलोग्रॅम) व एस. बिंदियाराणी देवी (55 किलोग्रॅम) स्वतंत्र गटातून आव्हान उभे करणार होते.
कोट्स
अव्वल दर्जाच्या कामगिरीबद्दल संकेत सरगरचे खास अभिनंदन! त्याने रौप्य जिंकल्यानंतर भारताच्या राष्ट्रकुल मोहिमेला जोरदार सुरुवात झाली. संकेतचे पुन्हा एकदा अभिनंदन आणि भविष्यातील वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा!
रौप्यजेता संकेत म्हणाला, माझे रौप्य स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित!
बर्मिंगहम राष्ट्रकुल स्पर्धेत दुसऱया स्थानी झेप घेणाऱया संकेत सरगरने आपले रौप्य स्वातंत्र्यसैनिकांना समर्पित केले. ‘प्राणाची आहूती देत आपल्या सर्वांना स्वातंत्र्य मिळवून देणाऱया थोर स्वातंत्र्यसैनिकांना मी माझे पदक समर्पित करु इच्छितो’, असे तो म्हणाला.
वेटलिफ्टिंग फायनलमध्ये सुवर्ण जिंकणे हेच मुख्य लक्ष्य होते. पण, नेमकी कशी परिस्थिती बदलली व आपल्याला सुवर्णपदकाचे प्रयत्न का सोडून द्यावे लागले, याचेही त्याने सविस्तर विवेचन केले.
‘वजन लिफ्ट करताना कोणतीही चूक नव्हती. पण, उजव्या ढोपरात मला अचानक वेदना जाणवल्या. तेथे अचानक लोड जाणवला. त्यानंतर मी ते सोसू शकलो नाही आणि यामुळे मला सुवर्णपदकाचे प्रयत्न सोडून द्यावे लागले. सरावात मी 143 किलोग्रॅम वजन उचलत असे. त्यामुळे, फायनलमध्ये फक्त सुवर्ण हेच लक्ष्य असल्याने मला आणखी एकदा तितक्याच ताकदीने प्रयत्न करायचे होते. मी आणखी सरस कामगिरी करु शकलो असतो. मात्र, एका मर्यादेच्या पलीकडे धोका पत्करणे कठीण होते. त्यावेळी लिफ्ट पूर्ण करणे अधिक महत्त्वाचे होते. शेवटच्या लिफ्टपूर्वी मी प्रशिक्षक विजय शर्मा यांच्याशी चर्चा केली आणि त्यानंतर सरावातील लिफ्टपेक्षा अधिक वजन उचलण्याचा निर्णय घेतला होता’, असे सरगर याप्रसंगी म्हणाला.
डोप चाचणीसाठी नमुने घेतले गेल्यानंतर मी एक्स-रे करुन घेणार आहे आणि त्यानंतरच याबाबत अधिक चित्र स्पष्ट होऊ शकेल, याचा त्याने उल्लेख केला.
सांगलीत जंगी स्वागत होईल, याची कल्पना आहे, मात्र!
‘राष्ट्रकुलमध्ये रौप्य जिंकले असल्याने सांगलीत खुशीची लहर उमटली असेल, मायभूमीत परतल्यानंतर माझे जोरदार स्वागत होईल, याची मला पूर्ण कल्पना आहे. पण, मागील 4 वर्षे सुवर्णपदकाचे स्वप्न राहिले, ते साध्य झाले असते तर अधिक आनंद झाला असता. पुढील वेळी आणखी ताकदीने आव्हान उभे करण्याचा माझा प्रयत्न असेल’, असे संकेतने येथे नमूद केले.









