गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांचा समावेश
बेंगळूर : ‘कर्नाटक गर्दी नियंत्रण विधेयक-2025 ची पडताळणी करण्यासाठी विधानसभेचे अध्यक्ष यु. टी खादर यांनी गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्या अध्यक्षतेखाली 11 सदस्यांचा समावेश असणारी परिशिलन समिती स्थापन केली आहे. मागील महिन्यात विधिमंडळ अधिवेशनात सदर विधेयक मांडण्यात आले होते. या विधेयकामुळे आंदोलने कमी होऊ शकतात. सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांवर प्रतिकूल परिणाम होऊ शकेल अशी चिंता व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे विरोधी पक्षाच्या आमदारांनी विधेयक सविस्तर चर्चा आणि पडताळणीसाठी सभागृह समितीकडे सोपविण्याची विनंती केली होती. 4 जून 2025 रोजी बेंगळूरच्या चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत 11 जणांचा मृत्यू झाल्यानंतर राज्य सरकारने गर्दी नियंत्रण विधेयक सादर केले होते. गर्दीवर प्रभावीपणे नियंत्रण ठेवणे, कार्यक्रम आणि समारंभांमध्ये मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या गर्दीचे योग्य व्यवस्थापन करणे तसेच बेकायदेशीर सभांना प्रतिबंध घालणे हा या विधेयकाचा हेतू आहे. सभागृहातील चर्चेनुसार विधानसभा अध्यक्षांनी विधानसभा कार्यपद्धती आणि कामकाज नियम 247 अंतर्गत विधेयकाची पडताळणी करून अहवाल सादर करण्यासाठी विधानसभेच्या आमदारांचा समावेश असलेली परिशिलन समिती स्थापन केली आहे.









