उमेदवार मुरलीधर पाटील यांची मेंढेगाळी, हत्तरवाड गावातही भव्य पदयात्रा : मतदार-कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर पाटील यांचा समिती कार्यकर्त्यांनी नंदगड, हलशी परिसरातील खेड्यात झंझावाती प्रचार केला. प्रचारात शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. यात महिलांचा सहभाग लक्षणीय होती. हलगा गावच्या महिलांनी प्रचारात सहभागी झालेल्या सर्वांसाठी भाकरी, भाजी अशी शिदोरी आणली होती. दुपारी विश्रांतीच्या वेळी शिवोली गावात सर्व प्रचारात सहभागी झालेल्या कार्यकर्त्यांनी शिदोरीचा आश्वाद घेतला. नंदगड, हलशी हा भाग कायमच समितीचा कट्टर बालेकिल्ला राहिलेला आहे. नंदगड जिल्हा पंचायत क्षेत्रात समितीला कायम मताधिक्य मिळत आलेले आहे. नंदगड परिसरातील खेड्यांत समितीनिष्ठ कार्यकर्त्यांची फौज आहे. या गावात राष्ट्रीय पक्षाने अनेकवेळा आमिषे दाखवून समितीचा बालेकिल्ला फोडण्याचा प्रयत्न केला आहे. रविवारी हलगा गावच्या महिला व युवा कार्यकर्त्यांनी प्रचारात सहभागी होऊन नंदगड परिसरातील गावात समितीचा झंझावाती प्रचार दौरा केला. यात हलशी, हत्तरवाड, मेंढेगाळी, भांबार्डा, नंदगड, शिवोली गावातून भव्य पदयात्रा काढत समितीच्या प्रचाराने गावे दणाणून सोडली. नंदगड गावात भव्य प्रचाररॅली काढण्यात आली. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी घेऊन समितीला मतदान करण्याचे आवाहन कार्यकर्त्यांनी केले.
हलगा गावात महालक्ष्मीला साकडे
हलगा येथील ग्रामस्थांनी ग्रामदेवता महालक्ष्मीला सर्व ग्रामस्थांनी एकत्र येऊन साकडे घातले. आणि यावेळी समितीला शंभर टक्के मतदान करण्याची शपथ घेतली. आणि समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील विजयी व्हावे, अशी मागणी यावेळी महालक्ष्मी देवीकडे करण्यात आली. राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार कोट्यावधी रुपये खर्चून प्रचार करत आहेत. मात्र समितीचे उमेदवार मुरलीधर पाटील यांना समितीचे कार्यकर्ते देणगी देवून स्वत:ची भाकर आणून प्रचार करत आहेत. त्यामुळे समितीला विजयाची निश्चित खात्री असल्याचे कार्यकर्ते सांगत आहेत. य् ाावेळी रणजीत पाटील, पुंडलिक कारलगेकर, विठ्ठल गुरव, डी. एम. गुरव, प्रमोद सावंत, विजय इश्राण, नागेश पाटील, नागेश फटाण, वैशाली सुतार, सावित्री इश्राण, शांता बेगडी, दत्तू कुट्रे, अप्पू पाटील, कृष्णा पाटील, बाळकृष्ण पाटील, गणेश नारळीकर, अंजना सुतार, वैजंती इश्राण, मंगला पाटील, ज्ञानेश्वर सनदी, लक्ष्मी फटाण, धाकलू बसेटकर, अमृत फटाण, मदन सुतार यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते.









