वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्पॅम कॉलला आळा घालण्यासाठी सरकार एक समिती स्थापन करू शकते. ही समिती विशेषत: इंटरनेट आणि व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून केलेल्या कॉलसाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार करणार असल्याची माहिती आहे. ग्राहक व्यवहार सचिव रोहित कुमार सिंग यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी मंत्रालयअंतर्गत बैठक झाली. या बैठकीत समिती स्थापन करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आल्याचे ग्राहक व्यवहार विभागाने ट्विटरवर जारी केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
दूरसंचार विभाग आणि भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाव्यतिरिक्त, तीन खाजगी क्षेत्रातील कंपन्या रिलायन्स जिओ, भारती एअरटेल आणि व्होडाफोन इंडिया यांनीही बैठकीत भाग घेतला. दूरसंचार विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, ग्राहक व्यवहार विभाग स्पॅम कॉल्स कमी करण्यासाठी कोणती पावले उचलत आहेत हे जाणून घेण्यास उत्सुक आहे.









