अर्थमंत्री सीतारामन यांची लोकसभेत घोषणा : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
जुनी पेन्शन योजना पुन्हा लागू करण्याची मागणी करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर आहे. सरकार लवकरच नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवार, 24 मार्च रोजी संसदेत वित्त विधेयक मांडताना ही माहिती दिली. वित्त सचिवांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली जाईल. ही समिती नव्या पेन्शन योजनेचा आढावा घेईल, असे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केले.
2004 पूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या पेन्शन योजनेअंतर्गत निवृत्तीनंतर निश्चित पेन्शन मिळत असे. ही पेन्शन कर्मचाऱ्याच्या निवृत्तीच्या वेळेच्या पगारावर आधारित होती. या योजनेत सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्यांच्या कुटुंबीयांनाही पेन्शन मिळण्याचा नियम होता. तथापि, अटलबिहारी वाजपेयी सरकारने एप्रिल 2005 नंतर नियुक्त कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजना बंद केली आणि त्याऐवजी नवीन पेन्शन योजना लागू केली. नंतर काही राज्यांनीही नवीन पेन्शन योजना लागू केली होती. सध्या या योजनेविषयी उलट-सुलट मतप्रवाह असलेले दिसून येत आहेत. काही राज्यांमध्ये यासंबंधी तीव्र आंदोलन सुरू असल्यामुळे सरकारने नव्या पेन्शन योजनेचा फेरआढावा घेण्याची तयारी दर्शवली आहे.









