जिल्हा प्रशासनाकडून अधिवेशनाची जय्यत तयारी : 18 कोटी खर्च करण्याचे नियोजन
बेळगाव : हिवाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. यासाठी कामे नेमून दिलेल्या अधिकाऱ्यांची वारंवार बैठक घेऊन कामांचा अहवाल जाणून घेतला जात आहे. तर दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यामध्ये यंदा दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली आहे. बहुतांश तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करण्यात आला आहे. यातच राज्य सरकारचे हिवाळी अधिवेशन बेळगाव येथील सुवर्णविधानसौध येथे दि. 4 डिसेंबरपासून सुरू होत आहे. त्यामुळे अधिवेशनासाठी येणाऱ्या मान्यवरांसाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे. अधिवेशनाला मुख्यमंत्री, मंत्रिमंडळाचे सदस्य, विरोधी पक्षनेते, आमदार तसेच वरिष्ठ अधिकारी, पोलीस, पत्रकार येत आहेत. याबरोबरच इतर कर्मचारीही येत असल्याने जिल्हा प्रशासनाला दररोज सहा हजार लोकांची व्यवस्था करावी लागणार आहे.
यामध्ये जेवण, वसती, वाहतूक आदी सुविधांचा समावेश आहे. या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन कार्यरत झाले आहे. सुवर्णविधानसौध येथे मंत्रिमंडळाच्या नेत्यांसह अधिकाऱ्यांसाठी असणाऱ्या कक्षांची तयारी, सभाभवन, विधानसभा व विधानपरिषद सभा भवनातील तयारी केली जात आहे. त्याठिकाणी टेबल, टीव्ही, एसी व्यवस्था आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. सभागृहातील अंतर्गत सजावट, मॅट घालणे आदी कामे केली जात आहेत. कक्षांची रंगरंगोटी या सर्व तयारीसाठी जवळपास 200 पेक्षा अधिक कर्मचारी सुवर्णविधानसौध येथे कार्यरत आहेत. अधिवेशनकाळात कोणतीच अनुचित घटना घडू नये, यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. गेल्या अधिवेशनामध्ये जिल्हा प्रशासनाला 20 कोटी अनुदान देण्यात आले होते. वायफळ खर्चावर नियंत्रण करत जिल्हा प्रशासनाकडून 20 कोटींपैकी 18 कोटी अनुदान खर्च केले होते. 2 कोटी अनुदानाची बचत केली होती. आता दुष्काळ असल्यामुळे 18 कोटी अनुदान खर्च करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
महनीय व्यक्तींसाठी आवश्यक सुविधा पुरविणार
अधिवेशनासाठी आवश्यक ती तयारी जिल्हा प्रशासनाकडून केली जात आहे. येणाऱ्या महनीय व्यक्तींसाठी वसती, जेवण, वाहतूक आदी सुविधा पुरविण्यात येणार असून वायफळ खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी विशेष समितीची रचना करण्यात आली आहे.
-जिल्हाधिकारी नितेश पाटील









