महिला – बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची ग्वाही : अतिवाड येथे सत्कार समारंभ
वार्ताहर /उचगाव
बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील जनतेच्या आशीर्वादामुळेच मी दुसऱ्यांदा निवडून आले. आणि संपूर्ण कर्नाटक राज्याची सेवा करण्याची संधी मला मिळाली. मी या ग्रामीण मतदार संघातील तमाम जनतेची सदैव ऋणी राहीन. या ग्रामीण मतदार संघाबरोबरच कर्नाटकातील विविध विकास कामांसाठी मी माझा जास्तीत जास्त वेळ देईन आणि विकास साधेन, असे मनोगत महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी व्यक्त केले. अतिवाड येथे काँग्रेस पक्षाच्यावतीने व गावातील विविध संघटना, ग्रामपंचायत सदस्य यांच्या संयुक्त विद्यमाने नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना लक्ष्मी हेब्बाळकर बोलत होत्या.
त्या पुढे म्हणाल्या, कर्नाटकातील दीड कोटी महिलांना गृहलक्ष्मी योजनेतून मदत मिळत आहे. उर्वरित महिलांना देखील ही मदत मिळणार आहे. प्रत्येक गावाला विविध सुविधा मिळवून देण्यासाठी माझा सदोदित प्रयत्न आहे. रस्त्यांच्या विकासाचे कामही लवकरच हाती घेण्यात येईल. आणि या अतिवाड-बेकिनकेरे रस्ता तातडीने पूर्ण करण्यात येईल. यावेळी त्यांचा गावच्यावतीने भव्य नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी गावामध्ये नव्याने सुरू केलेल्या व्यायामशाळेचे उद्घाटनही हेब्बाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते युवराज कदम, मारुती बेळगावकर, कलाप्पा कडोलकर, युवा नेते मृणाल हेब्बाळकर, वसंत कणबरकर, कल्लाप्पा कांबळे यासह काँग्रेसचे कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.









