मंत्री सतीश जारकीहोळी : सांस्कृतिक कार्यक्रमाची सांगता
बेळगाव : विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठीच सतीश शुगर्स अॅवॉर्ड सांस्कृतिक कार्यक्रम पुन्हा प्रारंभ करण्यात येत आहे. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम राबविला जातो. विद्यार्थ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहोत, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले. गोकाक येथे वाल्मिकी मैदानावर सतीश जारकीहोळी फौंडेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या 20 व्या सतीश शुगर्स अॅवॉर्ड कार्यक्रमाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. 1 कोटी निधीतून मैदानावर उभारण्यात आलेल्या हायमास्ट विद्युत दिव्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले.
ते म्हणाले, आपण अनेक विकासकामे राबविली आहेत. राज्यस्तरावर अद्यापही अनेक विकासकामे राबविणे गरजेचे आहे. त्यासाठीच हा उपक्रम हाती घेतला आहे. यापुढे हे कार्यक्रम राहुल व मुलगी प्रियांका यांच्या नेतृत्वामध्ये चालणार आहेत. गेल्या चार दिवसांपासून अनेक सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भाग घेऊन समाजकार्य केले आहे. जनतेने ज्याप्रमाणे आपल्याला आशीर्वाद दिला आहे, तसाच आशीर्वाद या दोघांनाही द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली. गोकाक तालुक्याच्या विकासासाठी अनेक योजना राबविणे गरजेचे आहे. टप्प्याटप्प्याने या योजना राबवून विकास करण्यात येईल, असे पालकमंत्र्यांनी सांगितले. यावेळी क्रीडा स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या तसेच शालेय, महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांनी मिळविलेले गुण व क्रीडा स्पर्धांमध्ये विशेष कामगिरी केलेल्यांची दखल घेऊन त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी आमदार विश्वनाथ वैद्य, बाबासाहेब पाटील, राहुल जारकीहोळी, प्रियांका जारकीहोळी, आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकारी महेश कोणी, मागासवर्गीय कल्याण खात्याचे अधिकारी बसवराज गलगली, शिक्षणाधिकारी, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिकसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.









