मुख्यमंत्री सिद्धरामय्या : आलमट्टी जलाशयाची उंची वाढविण्यासंबंधी बैठक
बेळगाव : आलमट्टी जलाशयाचा पाणीसाठा 519.60 मीटरपासून 524.26 मीटरपर्यंत वाढविण्याच्या कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यास राज्य सरकार कटीबद्ध आहे अशी माहिती मुख्यंमत्री सिद्धरामय्या यांनी दिली. कृष्णाकाठ योजनेच्या तिसऱ्या टप्प्यातील भूसंपादन, पुनर्वसन आणि पुर्ननिर्माण संबंधी सुवर्णसौध येथे सोमवारी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. याप्रसंगी ते म्हणाले, आलमट्टी जलाशयाची उंची टप्प्याटप्प्याने वाढविण्यात येईल. या योजनेसाठी पाणलोट क्षेत्रात जमिनी गमवाव्या लागणाऱ्यांचे पुनर्वसन आणि कालवा निर्मितीसाठी अंदाजे 1 लाख 33 हजार 867 एकर जमीन संपादन करावी लागणार आहे. आतापर्यंत 28 हजार 967 एकर जमीन संपादीत केली आहे. 1 लाख 4 हजार 963 एकर भूसंपादन बाकी आहे असे त्यांनी सांगितले. जलाशयाच्या बॅकवॉटरमुळे बुडणाऱ्या 188 गांवासंबंधीत पुनर्वसनासंबंधी 73 हजार 20 एकर जमीन भूसंपादन करणे बाकी आहे. 2022 मध्ये तत्कालीन सरकारने या संबंधी दोन टप्प्यात भूसंपादन करण्याचा निर्णय घेतला होता.
त्यात बदल करून एकाच टप्प्यात भूसंपादन करण्यात येईल. जमिनी गमवाव्या लागणाऱ्या शेतकऱ्यांना जमिनीचा बाजारपेठ दर, मालमत्तेचे मार्गसूची दर, भूसंपादन कायदा आदीबाबी विचारात घेऊन भरपाई देण्यास सरकार कटीबद्ध आहे. शेतकऱ्यांसाठी ही योजना जारी केली असून जमिनीच्या भरपाईसंबंधी योग्य दर निश्चित करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा. शेतकऱ्यांवर अन्याय होऊ नये आणि सरकारवरही भार पडू नये असा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. भूसंपादनासंबंधी 20 हजार प्रकरणे न्यायालयात प्रविष्ट आहेत. ही प्रकरणे मागे घेऊन वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करावा. मंत्रिमंडळ बैठकीतही याबाबत चर्चा करून योग्य निर्णय घेण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बैठकीत उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, बागलकोट जिल्हा पालकमंत्री आर. बी. तिम्मापूर, उद्योगमंत्री एम. बी. पाटील, मुख्यमंत्र्यांचे आर्थिक सल्लागार बसवराज रायरेड्डी, कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच. के. पाटील उपस्थित होते.









