वाहनांची, वाहनचालकांची केली तपासणी
बेळगाव : बेळगाव महानगरपालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी यांनी शहरातील कचरा समस्या चांगलीच मनावर घेतली असून त्यांनी पहाटे शहरातून फेरफटका मारण्याचा सपाटा सुरु केल्यामुळे कचरा व्यवस्थापन विभाग खडबडून जागे झाला आहे. दरम्यान आज पहाटे साडेपाच वाजता आयुक्तांनी स्वतः कचरा वाहनातून प्रवास केला.

सदाशिवनगर येथील कचरा वाहन शाखेला भेट देऊन वाहनांची आणि वाहनचालकांची तपासणी केली. यावेळी त्यांनी वाहनचालक आणि क्लीनर यांना सकाळी 5:45 वाजता ड्युटीवर हजर राहून कामे चोखपणे पार पाडण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर त्यांनी नगरसेवक अफरोज मुल्ला यांच्यासह प्रभाग क्रमांक 5 मधील खडेबाजार आणि दरबार गल्लीतील कचरा समस्येची पाहणी केली. येथील जनतेच्या तक्रारीही त्यांनी जाणून घेतल्या. त्यानंतर कोतवाल गल्ली आणि काकर गल्ली भाजी मार्केटला भेट दिली आणि अधिकाऱ्यांना त्याच दिवशी रात्री ९.०० नंतर भाजी मंडईतील कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे निर्देश दिले.

आयुक्तांनी पर्यावरण अभियंत्यांची बैठक बोलावून मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण करणाऱ्यांना सूचना करण्याचे आदेश दिले. त्यानंतर त्यांनी मध्यवर्ती बसस्थानकाला भेट देऊन कचऱ्याची वेळेवर विल्हेवाट लावण्याचे महत्त्व पटवून दिले आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना केल्या.









