दुसऱ्या दिवशीही शहरातील विविध भागांना दिली भेट : कर्मचाऱ्यांची घेतली हजेरी
बेळगाव : महापालिका आयुक्त आता पहाटेच विविध ठिकाणी भेट देत असल्यामुळे सफाई कर्मचारी तसेच वाहन चालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे 5.30 वाजता अशोक दुडगुंटी यांनी महापालिकेच्या वाहन गोडावूनला भेट दिली. यावेळी त्यांनी वाहनधारकांची उपस्थिती, तसेच वाहनांची पाहणीही केली. त्यानंतर दक्षिण मतदारसंघातील विविध प्रभागांना भेट देऊन कचऱ्याची समस्या जाणून घेतली आहे. महापालिका आयुक्तांनी दुसऱ्या दिवशीही पहाटेच शहरात फेरी मारली. आरोग्य निरीक्षक तसेच वॉर्डच्या बीट निरीक्षकालाही याबाबत चौकशी केली. कोण गैरहजर आहेत, किती माणसे काम करत आहेत, हे सर्व आकडे ऐकून घेतले. मोकळ्या जागांमध्ये अनेकांनी कचरा टाकला होता. याचबरोबर त्याठिकाणी झाडे-झुडुपे वाढली होती. त्या प्लॉट मालकांनाही साफसफाई करण्याची सूचना द्यावी, असे त्यांनी सांगितले.
प्लॉट व खुल्या जागांच्या मालकांनी सफाई केली नाही तर महानगरपालिकेच्यावतीने सफाई करून त्याचा खर्च जागा मालकांकडून वसूल केला जाईल, असा इशाराही दिला आहे. रेल्वेस्थानक परिसरातही भेट दिली. युजीडीसंदर्भात त्यांनी चौकशी केली. सांडपाणी रस्त्यावर साचत आहे. त्याबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या. भाजीमार्केट तसेच मुख्य बाजारपेठेमध्ये रात्री 10 वाजताही कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडीची सोय करण्यात आली आहे. तो कचरा जमा करून वेळेत कचराडेपोला न्यावा, असेही त्यांनी सांगितले. प्रत्येक प्रभागातील कचऱ्याची उचल वेळेत करावी, कोणत्याही प्रकारे कामचुकारपणा करू नये, अशी सक्त ताकीद त्यांनी दिली आहे. दक्षिण मतदारसंघामध्येही पहाटेच्यावेळी भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या आहेत. कपिलेश्वर, महात्मा फुले रोड परिसरात फिरून त्यांनी पाहणी केली.
सर्वच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले…
महापालिका आयुक्त अशोक दुडगुंटी पहाटेच फिरत असल्यामुळे सर्वच अधिकाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. इतक्या पहाटे आयुक्तच बाहेर पडत आहेत, त्यामुळे अधिकाऱ्यांनाही पहाटेच आपल्या प्रभागांमध्ये हजर रहावे लागत आहे. एरव्ही केवळ साफसफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूचना करून निवांत घरी राहणाऱ्या अधिकाऱ्यांना आता चांगलाच दणका बसला आहे.









