बेंगळूरवरून परतताच दुसऱ्या दिवशी फिल्डवर आयुक्त दाखल : अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना सूचना
बेळगाव : कामानिमित्त महापालिका आयुक्त बेंगळूरला जाऊन आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी शुक्रवारी पहाटे पुन्हा सदाशिवनगर येथील वाहनांचे गोडावून, त्याचबरोबर शहरातील मध्यवर्ती प्रभागांना भेट दिली. त्या ठिकाणी पाहणी करून अधिकारी तसेच वाहनाचे चालक आणि क्लीनर यांना सूचना केल्या आहेत. स्वच्छता कर्मचाऱ्यांनाही त्यांनी यावेळी कचरा उचलण्याबाबत काळजी घ्यावी, असे सांगितले. मनपा आयुक्त अशोक दुडगुंटी यांच्या या कार्यप्रणालीमुळे महापालिकेतील इतर अधिकारी व कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच झोप उडाली आहे. तर त्यांच्या या कार्याबद्दल अनेकांतून समाधानही व्यक्त करण्यात येत आहे. महापालिकेचे आयुक्त अशोक दुडगुंटी हे नेहमीच कार्यतत्पर राहतात. अत्यंत शिस्तबद्धरित्या आणि कर्तव्यदक्ष राहून महापालिकेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून कामे करून घेत आहेत. शहरातील कचऱ्याची उचल करण्यावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केले आहे. जनतेच्या तक्रारी वाढल्यामुळे त्यांनी हे पाऊल उचलले आहे. शुक्रवारी पहाटे 5.30 वाजता सदाशिवनगर येथील वाहनांच्या गोडावूनमध्ये भेट दिली. त्यावेळी त्यांनी वाहनचालक व क्लीनर यांना वाहने चालविण्याबरोबरच स्वत:चीही काळजी घेण्याची सूचना केली आहे.
आयुक्त रिक्षामध्ये बसूनच वॉर्ड क्रमांक 5 मध्ये दाखल झाले. त्यांनी खडेबाजार, दरबार गल्ली येथील कचरा कुंडांची पाहणी केली. तेथील भाजी मंडईमध्ये जाऊन त्यांनी पाहणी केली. सायंकाळी वाहने फिरत आहेत. त्यावेळी जास्तीतजास्त कचरा प्रत्येकाने द्यावा, यासाठी अधिकाऱ्यांनी जनजागृती करावी, असे त्यांनी स्पष्ट केले. नगरसेविका अफरोज मुल्ला यादेखील यावेळी उपस्थित होत्या. कोतवाल गल्ली, काकर गल्ली यासह भाजी मंडईमध्ये सर्वत्र फिरून त्यांनी पाहणी केली. पै हॉटेल परिसरातही त्यांनी फेरफटका मारला. हॉटेलचालकांना ओला आणि सुका कचरा स्वतंत्रपणे द्यावा. तोही रात्री 9.30 च्या दरम्यान वाहने येतात त्यावेळी दिवसभरचा कचरा संपूर्ण द्यावा. जेणे करून दुसऱ्या दिवशी ताण पडणार नाही, याची प्रत्येकाने दक्षता घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली आहे. मध्यवर्ती बसस्थानकाकडे जाऊनही त्यांनी पाहणी केली. तेथील केएसआरटीसीच्या अधिकाऱ्यांनाही कचऱ्याची विल्हेवाट करण्याबाबत त्यांनी सूचना केली. शहरातील फेरफटक्यानंतर रुक्मिणीनगर येथेही धाव घेतली. त्या वॉर्डामध्येही जाऊन त्यांनी पाहणी करून सूचना केल्या. कोणत्याही परिस्थितीत कचऱ्याची उचल वेळेत झाली पाहिजे. याचबरोबर जनतेनेही त्यासाठी सहकार्य करणे तितकेच गरजेचे असल्याचे ते म्हणाले. महापालिका आयुक्त पहाटेच आल्यामुळे इतर अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांनाही वेळेवर उपस्थित रहावे लागत आहे. एकूणच आयुक्तांच्या या मोहिमेमुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांचेही धाबे दणाणले आहेत.









