व्यावसायिकांना होणार लाभ
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
तेल विपणन कंपन्यांनी गॅस सिलिंडरच्या दरात बदल केला आहे. 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 41 रुपयांची कपात करण्यात आली आहे. नवी किंमत मंगळवारपासून लागू झाली आहे. आता दिल्लीत कमर्शियल गॅस सिलिंडर 1762 रुपयांमध्ये उपलब्ध होणार आहे.
तर घरगुती वापराच्या गॅस सिलिंडरच्या दरात कुठलाच बदल करण्यात आलेला नाही. यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 14.50 रुपयांनी कमी करण्यात आली होती.
तेल विपणन कंपन्या आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील कच्च्या तेलाचे अन् नैसर्गिक वायूचे दर विचारात घेत देशांतर्गत दर बदलत असतात. डिसेंबर महिन्यात 19 किलोग्रॅमच्या कमर्शियल गॅस सिलिंडरची किंमत 62 रुपयांनी वाढविण्यात आली होती. तर एप्रिल महिन्याच्या प्रारंभी कमर्शियल गॅस सिलिंडर स्वस्त झाल्याने व्यावसायिकांना लाभ होणार आहे. रेस्टॉरंट, हॉटेल आणि अन्य व्यावसायिकांकडून या सिलिंडरचा वापर केला जातो. कर आणि वाहतुकीच्या खर्चाच्या आधारावर सिलिंडरचे दर प्रत्येक राज्यात वेगवेगळे असू शकतात.
मागील महिन्यात एक मार्च रोजी तेल विपणन कंपन्यांनी कमर्शियल गॅस सिलिंडरच्या किमतीत 6 रुपयांची वाढ केली होती. परंतु मागील 5 वर्षांमध्ये सर्वात कमी मूल्यवाढ 2025 मध्ये झाली आहे.









